१८ वाहनांमधून तब्बल १०७ गुरांची कत्तलीसाठी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:54 PM2019-03-19T13:54:14+5:302019-03-19T13:55:54+5:30
अकोला: मध्यप्रदेशातून सातपुडा मार्गे तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल १८ वाहनांमध्ये १०७ जनावरांना कत्तलीसाठी नेण्यात येत असताना स्थानिक गुन्हे शाखेने पाळत ठेवून या गुरांना सोमवारी पहाटे जीवनदान दिले.
अकोला: मध्यप्रदेशातून सातपुडा मार्गे तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल १८ वाहनांमध्ये १०७ जनावरांना कत्तलीसाठी नेण्यात येत असताना स्थानिक गुन्हे शाखेने पाळत ठेवून या गुरांना सोमवारी पहाटे जीवनदान दिले. सदर १८ वाहने ताब्यात घेण्यात आले असून, तब्बल १०७ गुरांना गोरक्षण संस्थेमध्ये ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती आहे.
पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख व स्थाानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून १८ वाहनांमध्ये तब्बल १०७ विविध जातीच्या जनावरांना कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात हिवरखेड मार्गावर झरी गेट येथील जंगलामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवून सदर वाहने जप्त केली तर त्यामधील १०७ गुरांना जीवनदान देण्यात आले आहे. ही वाहने हिवरखेड पोलीस ठाण्यामध्ये जमा करून कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारी हिवरखेड येथे आठवडी बाजार असल्यामुळे बनावट पावतीच्या आधारे जनावरांची खरेदी-विक्री होत असल्याची माहिती पुढे आली आहे. अठरा वाहनांमध्ये अतिशय निर्दयपणे कोंबून या जनावरांना कत्तलीसाठी नेण्यात येत होते; मात्र पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संबंधित जनावरांना जीवदान देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. सदर ठिकाणावरून काही आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी गोवंश तस्करांच्या मुसक्या आवळल्या असून, एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईतील १८ वाहने व जनावरांची किंमत लाखोंच्या घरात असून, हा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी या टोळीला चांगलाच दणका दिला आहे.