गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक
By Admin | Published: September 21, 2016 02:04 AM2016-09-21T02:04:15+5:302016-09-21T02:04:15+5:30
वीसपैकी दोन जनावरे मृत्युमुखी, तीन आरोपी गजाआड.
अकोला, दि. २0 - फतेह चौक परिसरातून मंगळवारी पहाटे एका ट्रकमध्ये २0 जनावरांना कत्तलीसाठी नेत असताना रामदास पेठ पोलिसांनी छापा मारून तीन आरोपींना अटक केली. यावेळी पोलिसांनी ट्रकमधील १८ जनावरांचे प्राण वाचविले; मात्र दोन जनावरांची निर्दयतेने वाहतूक केल्याने त्यांचा मृत्यू झाला.
रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फतेह चौक परिसरातून एमएच ४0 एके १८९१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये २0 जनावरांची निदर्यतेने वाहतूक करण्यात येत होती. या प्रकरणाची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांनी पाळत ठेवून ट्रक ताब्यात घेतला. त्यानंतर ट्रकमधील १८ जनावरांना जीवनदान दिले, तर दोन जनावरांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी नागपूर येथील रहिवासी ट्रकचालक गुरुदयाल सिंह बचन सिंह याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली. या तिघांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम ५, ५ ब नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तीनही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने तीनही आरोपींना २३ सप्टेंबरपर्यंंंंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जनावरे खरेदीदाराचा पोलिसांना शोध
एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कत्तलीसाठी जनावरे नेल्या जात असल्याचे समोर आले, तरी या जनावरांची खरेदी करणारा व्यापारी कोण? याचा पोलीस शोध घेत आहेत.