ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आज मध्यरात्रीपासून संपावर
By admin | Published: July 31, 2015 01:48 AM2015-07-31T01:48:28+5:302015-07-31T01:48:28+5:30
ट्रान्सपोर्टनगरचेही भिजत घोंगडे.
अकोला : जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना महानगरपालिका हद्दीत प्रवेश बंदी केली असून, ट्रान्सपोर्टनगरची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली नाही. परिणामी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी दररोज लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. या बाबत जिल्हा प्रशासनाला वारंवार दिलेल्या निवेदनांवर सकारात्मक विचार करण्यात आला नसल्याने शहरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक शुक्रवार ३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत.
जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने ६ जुलैपासून सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंंत ट्रान्सपोर्टधारकांच्या मालवाहू जड वाहनांना शहराच्या हद्दीत बंदी घालण्यात आली आहे. ट्रान्सपोर्टनगरअभावी शहरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच हा निर्णय घेण्यात आल्याने ट्रान्सपोर्टच्या मालवाहू जड वाहनांना बंदी घातल्याने ट्रान्सपोर्ट व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. या निर्णयामुळे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने व्यावसायिक संकटात सापडले आहेत. शहरात घातलेली प्रवेश बंदी शिथील करण्यात यावी, अशी मागणी ट्रान्सपोर्ट संघटनेच्यावतीने ७ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती. निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री, पालकमंत्री, पोलीस अधीक्षक, वाहतूक निरीक्षक आदींना देण्यात आली होती. परंतु, प्रशासनाच्या वतीने या निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्याने संघटनेच्यावतीने २0 जुलै रोजी पुन्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दुसर्यांदाही प्रशासनाने याबाबत गांभीर्य दाखवले नसल्याने ट्रन्सपोर्ट आणि संबंधित व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्यावतीने घेण्यात आला. त्या अनुषंगाने शहरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक शुक्रवार, ३१ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.