अकोला शहरात वाहतूक व्यवस्थेचा बट्टय़ाबोळ
By Admin | Published: September 16, 2014 06:22 PM2014-09-16T18:22:23+5:302014-09-16T18:22:23+5:30
दुचाकी व तीनचाकी वाहने वाट्टेल तिथे लावण्यात येत असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळते.
अकोला - शहरातील बेताल वाहतुकीने कळस गाठला असून, दुचाकी व तीनचाकी वाहने वाट्टेल तिथे लावण्यात येत असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळते. रस्त्याच्या मधोमध वाहने लावण्यात येत असून, यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पुढाकार घेऊन वाहतूक शाखेच्या माध्यमातून टोईंग पथक सुरू केले आहे. टोईंग पथक सुरू होऊन पाच ते सहा दिवसांचा कालावधी उलटला असला तरी बहुतांश मार्गावरील वाहतूक व्यवस्था अद्यापही आहे त्याच स्थितीत आहे. वाहन चालक कुठलेही नियम पाळत नसून आपली दुचाकी रस्त्यावर तसेच रस्त्याच्या मधोमध लावत असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. शहरातील अत्यंत रहदारीचे असलेल्या मार्गावर वाहतुकीला मोठय़ा प्रमाणात अडथळा निर्माण होत असून, याला ही वाहने जबाबदार असल्याचे दिसून आले. दुकान व कार्यालयासमोर असलेल्या रस्त्यावर वाहने लावण्यात येत असून, त्यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. टोईंग पथक कार्यान्वित केल्यानंतर रस्त्यावरील अस्ताव्यस्त वाहनांवर कारवाई होणार, अशी अपेक्षा होती. मात्र, या टोईंग पथकातील कर्मचार्यांकडून दुजाभाव करण्यात येत असल्याने शहरातील बेताल वाहतूक आहे त्याच स्थितीत आहे. या टोईंग पथकाची कारवाई शहराच्या मध्यभाग व रहदारीचा मार्ग सोडून शहराबाहेर असलेल्या परिसरात सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गांधी रोड, टिळक रोड, स्टेशन ते कौलखेड रोड, सिव्हिल लाईन्स रोड, रतनलाल प्लॉट, जठारपेठ, दुर्गा चौक, जय हिंद चौक, जिल्हाधिकारी कार्यालय रोडसह शहराच्या महत्त्वाच्या मार्गावर वाहने लावण्यात येत असून, यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावरील अस्ताव्यस्त वाहनांवर कारवाई केल्यास वाहतुकीची समस्या बहुतांश प्रमाणात मार्गी लागण्याची शक्यता आहे.