राज्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक संपावर
By admin | Published: August 1, 2015 02:05 AM2015-08-01T02:05:33+5:302015-08-01T02:05:33+5:30
संप यशस्वी करण्याचे आवाहन.
अकोला : ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या वाहनांना महानगरपालिका हद्दीत प्रवेश बंदी घालण्यात आल्याने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी शुक्रवार, ३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून संपाला सुरुवात केली आहे. तत्पूर्वी जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली असून, संप यशस्वी करण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मजहर खान यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीला शहरातील सर्व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची उपस्थिती होती. व्यावसायिकांना वाहने उभी करण्यासाठी ट्रान्सपोर्टनगरची सुविधा उपलब्ध नाही. तर दुसरीकडे जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने ६ जुलैपासून सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत ट्रान्सपोर्टधारकांच्या मालवाहू जड वाहनांना शहराच्या हद्दीत बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. परिणामी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक संकटात सापडले असून, चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने शहरात घातलेली प्रवेश बंदी शिथिल करण्यात यावी, या मागणीसाठी वारंवार निवेदने देण्यात आली आहे. परंतु, निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. त्या अनुषंगाने जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्यावतीने शुक्रवार, ३१ जुलैपासून बेमुदत संप पुकारण्यात येत असल्याचे यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मजहर खान यांनी सांगितले. या संपाला शहरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी यशस्वी करावे, असे आवाहनदेखील यावेळी त्यांनी केले.