वाघ आढळलेल्या परिसरात लावले ट्रॅप कॅमेरे
By Atul.jaiswal | Published: December 20, 2021 10:57 AM2021-12-20T10:57:21+5:302021-12-20T10:58:30+5:30
Trap cameras installed in the area where the tiger was found : वाघाचे अस्तित्व असल्याचे पुरावे टिपण्यासाठी या परिसरात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.
अकोला : अकोला वन विभागांतर्गत जवळा शेतशिवारात वाघ आढळून आल्यानंतर वनविभाग सतर्क झाला असून, रविवारी दुसऱ्या दिवशीही या परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, वाघाचे अस्तित्व असल्याचे पुरावे टिपण्यासाठी या परिसरात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.
जवळा येथील नीलेश सारसे यांच्या शेतात शनिवारी सकाळी वाघ आढळून आला होता. गावातीलच रवी सारसे यांनी शेतातून मार्गक्रमण करीत असलेल्या वाघाचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाच्या पथकाने शनिवारी या परिसराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी वाघाच्या पायाचे ठसेही आढळून आले. रविवारी सहायक वनसंरक्षक सुरेश वडोदे यांच्या नेतृत्वात वनविभागाच्या चमूने पुन्हा भेट देऊन परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविले. रविवारी संपूर्ण दिवसभर हा परिसर पिंजून काढण्यात आला. परंतु वाघ आढळून आला नाही. वाघ या परिसरातच दडून बसलेला असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगावी, अशा सूचनाही करण्यात आल्या.
शेतातील इलेक्ट्रिक करंट वाघासाठी धोकादायक
या परिसरातील शेतांमध्ये काही शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विजेच्या तारा लावलेल्या असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसून आले आहे. वाघ या परिसरातच असेल तर शेतामध्ये लावलेल्या विजेच्या तारा वाघासाठी धोकादायक ठरू शकतात. विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्यास भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत सात वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही दिवस शेतातील इलेक्ट्रिक करंट असलेल्या तारा काढून टाकाव्यात, असे आवाहन वनविभागाने केले आहे.