तीन वर्षांत सर्वोपचारमध्ये १२ लाख रुग्णांवर उपचार!
By admin | Published: March 7, 2016 02:32 AM2016-03-07T02:32:52+5:302016-03-07T02:32:52+5:30
१ लाख ३३ हजार रुग्ण झाले होते भरती; अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांची माहिती.
नितीन गव्हाळे / अकोला
पश्चिम विदर्भाचे ट्रॉमाकेअर म्हणून ओळखले जाणार्या सर्वोपचार रुग्णालयामध्ये गत काही वर्षांपासून दर्जेदार आरोग्य सुविधा मिळु लागल्याने गोरगरीब रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय आधारस्तंभ ठरले आहे. गत तीन वर्षांमध्ये जिल्हय़ातील नव्हे तर पश्चिम विदर्भातील १२ लाख २४ हजार १९ गोरगरीब रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.
महागड्या आरोग्य सुविधा आणि खासगी रुग्णालये, डॉक्टरांची महागलेली फीस आणि उपचारासाठी येणारा अवाढव्य खर्च पाहता, गोरगरीब रुग्ण सर्वोपचार रुग्णालयाकडे आशेचा किरण म्हणून बघतात. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सर्वोपचार रुग्णालयात रूपांतर करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडण्यात आले. त्यानंतर सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होऊ लागली. एक्स-रे, सिटी स्कॅनसाठी नवीन उपकरणे लावण्यात आली. रुग्णालयातील कामकाजाचे संगणकीकरण करण्यात आले. राज्य शासनाकडून मोठय़ा प्रमाणात निधी मिळू लागल्याने रुग्णालयामध्ये असाध्य रोगांवरील शस्त्रक्रियासुद्धा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची पाऊले सर्वोपचार रुग्णालयाकडे वळू लागली. याठिकाणी दर्जेदार म्हणण्यापेक्षा बर्याचअंशी चांगल्या आरोग्य सुविधा मिळू लागल्या. रुग्णालयात भरती होणार्या रुग्णांना चहा, दूध, अल्पोपहार, केळी आणि भोजन देण्यात येते. पिवळे व केशरी कार्डधारकांना याठिकाणी मोफत उपचार देण्यात येतात. अधिष्ठाता म्हणून डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी पदभार सांभाळल्यानंतर गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळेच रुग्णांची संख्या सर्वोपचार रुग्णालयाकडे वाढू लागली आहे.