चाचणीच्या भीतीने आजारावर घरीच उपचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 10:30 AM2021-02-28T10:30:52+5:302021-02-28T10:31:11+5:30
CoronaVirus News नागरिकांच्या या बेफिकिरीमुळे कोरोनाचा फैलाव होत आहे.
अकोला : वातावरणातील बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे घरोघरी रुग्णांची संख्या वाढली असून, चाचणीच्या भीतीने लोक घरीच उपचार घेत असल्याचे वास्तव आहे. योग्य उपचार न मिळाल्याने गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या या बेफिकिरीमुळे कोरोनाचा फैलाव होत असून, वेळीच चाचणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. मात्र अनेक जण चाचणीच्या भीतीने घरीच उपचार घेत असल्याचे वास्तव आहे. कोरोनाच्या भीतीने लोक चाचणी टाळत आहेत. त्यामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनादेखील गंभीर लक्षणे आढळून येत आहेत. साधा ताप, सर्दी असा समज घेऊन घरीच उपचार करणारे रुग्ण कुटुंबातील इतर सदस्यांच्याही संपर्कात येत आहेत. कुटुंबातील लोक घराबाहेरील इतर लोकांच्या संपर्कात येत असल्याने कोविडच्या संसर्गाची साखळी निर्माण होत आहे. नागरिकांच्या या बेफिकिरीमुळे कोरोनाचा फैलावही वाढत आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाच्या सहकार्याची गरज असून, लक्षणे दिसताच कोविडची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
लक्षणे दिसताच स्वत:ला आयसोलेट करा
सर्दी, खोकला आणि ताप म्हणजे कोरोना नाही. वातावरणातील बदलांमुळेही आरोग्यविषयक या समस्या उद्भवू शकतात, मात्र खबरदारी म्हणून अशी लक्षणे दिसताच रुग्णांनी एका खोलीत स्वत:ला विलगीकरणात ठेवावे. इतरांच्या संपर्कात न येता वेळेतच कोविड चाचणी करून घ्यावी.
कुठे करावी चाचणी
कोविड ओपीडी सर्वोपचार रुग्णालय
भरतीया रुग्णालय, मनपा
आयएमए सभागृह
त्रीसूत्रीचे पालन करा
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी अजूनही प्रभावी औषध उपलब्ध नाही. त्यामुळे कोविडच्या संसर्गापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या अनुषंगाने नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, तसेच वारंवार दात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहे. घरी उपचारापेक्षा नागरिकांनी कोविड चाचणी करून घ्यावी. तसेच इतरांनाही कोविड चाचणीसाठी प्रोत्साहित करावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला मंडळ, अकोला