अकोल्यात ‘म्युकरमायकोसिस’च्या सहा रुग्णांवर उपचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:18 AM2021-05-11T04:18:49+5:302021-05-11T04:18:49+5:30
अकोला : कोविडचे गंभीर रुग्ण बरे झाल्यानंतर रुग्णांमध्ये ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराची लक्षणे आढळून येत आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच ...
अकोला : कोविडचे गंभीर रुग्ण बरे झाल्यानंतर रुग्णांमध्ये ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराची लक्षणे आढळून येत आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच अकोल्यातही अशी लक्षणे असलेले सुमारे सहा रुग्ण आढळल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. सद्यस्थितीत यातील एका रुग्णावर उपचार सुरू असून, पाच रुग्ण बरे झाल्याची माहिती आहे. कोविडच्या गंभीर रुग्णांवर उपचारादरम्यान स्टेरॉईडचा वापर झाल्यास काही रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येतात. म्युकरमायकोसिसची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना नाक, डोळा निकामी होणे यासह अन्य लक्षणे दिसू लागतात. या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मुकुंद अष्टपुत्रे यांच्याशी संवाद साधला असता, अकोल्यात असे सहा रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार झाल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णाच्या डोळ्यात किंवा नाकाच्या हाडामध्ये त्रास जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.