वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ६५ लाख; खड्डे ६२ लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 02:49 PM2019-06-17T14:49:18+5:302019-06-17T14:52:47+5:30
पावसाळा तोंडावर आला असल्याने प्रलंबित असलेले २ लाख ९२ हजार खड्डे केव्हा तयार होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अकोला : वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात यावर्षी ६५ लाख ५१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी १५ जूनपर्यंत विविध यंत्रणांमार्फत ६२ लाख २९ हजार खड्डे तयार करण्यात आले असून, उर्वरित २ लाख ९२ हजार खड्डे करण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. पावसाळा तोंडावर आला असल्याने प्रलंबित असलेले २ लाख ९२ हजार खड्डे केव्हा तयार होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात ६५ हजार ५१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ५४ यंत्रणांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. संबंधित यंत्रणांमार्फत जिल्ह्यातील ४ हजार ६० ठिकाणी वृक्ष लागवड करायची आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्ष लागवड करायची आहे. त्यानुषंगाने वृक्ष लागवडीसाठी संबंधित यंत्रणांमार्फत खड्डे तयार करण्याचे काम सुरू आहे. सामाजिक नवीकरण विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार १५ जूनपर्यंत जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत वृक्ष लागवडीसाठी ६२ लाख २९ हजार खड्डे तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित २ लाख ९२ हजार खड्डे तयार करण्याचे काम अद्याप बाकी आहे. पावसाळा तोंडावर आला असून, पावसाळ्यात खड्डे तयार करण्याचे काम करता येणार नाही. त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी अद्याप प्रलंबित असलेले खड्डे तयार करण्याचे काम केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विभागीय आयुक्तांनी दिला होता ‘अल्टिमेटम’!
वृक्ष लागवड अंतर्गत जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वृक्ष लागवडीकरिता खड्डे तयार करण्याचे ३० मेपूर्वी पूर्ण करण्याचा ‘अल्टिमेटम’ विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी गत ११ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत संबंधित यंत्रणांना दिला होता; परंतु जिल्ह्यात २ लाख ९२ हजार खड्डे तयार करण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे.