मुंडगाव पादुका संस्थान राबविणार वृक्षारोपण महाअभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:19 AM2021-05-06T04:19:07+5:302021-05-06T04:19:07+5:30
जगद्गुरू तुकोबाराय सोळाव्या शतकातच वृक्ष, पर्यावरणाचे महत्त्व सांगून गेले. श्री गजानन महाराजांचा चरित्र ‘श्री गजानन विजय’ या ग्रंथाचा ...
जगद्गुरू तुकोबाराय सोळाव्या शतकातच वृक्ष, पर्यावरणाचे महत्त्व सांगून गेले. श्री गजानन महाराजांचा चरित्र ‘श्री गजानन विजय’ या ग्रंथाचा सारसुद्धा वृक्ष, जल संरक्षण असाच आहे. सध्या आपल्या देशावर कोरोना संकट उभे राहिले आहे. या विषाणूमुळे संपूर्ण मानवजात संकटात आली आहे. कोरोना या आजारात रुग्णास प्राणवायूची नितांत आवश्यकता भासू लागली आहे. दररोज कित्येक रुग्णांना प्राणवायूअभावी आपला प्राण गमवावा लागला. हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. याआधी मानवाने आपल्या गरजा भागवण्यासाठी लाखो वृक्षांची अमानुषपणे कत्तल केली आहे. आज लाखो रुपये खर्च करून प्राणवायू मिळत नाही. वृक्ष ही नैसर्गिक ऑक्सिजन बनवणारी एकमेव फॅक्टरी आहे. फुकटचा प्राणवायू देणाऱ्या झाडांची संख्या वाढवण्याची व संगोपन करण्याची नितांत आवश्यकता आहे. ऑक्सिजनकरिता देशात मिशन ऑक्सिजन राबविण्यात येत आहे. त्यात खारीचा वाटा म्हणून श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगावचे वतीने दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. यंदासुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्याकरिता संस्थानद्वारा भव्य रोपवाटिका स्थापन होत आहे. संस्थानच्या वतीने संत नगरी मुंडगाव व परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून त्याची जोपासना, संवर्धन करण्यासाठी संस्थान सज्ज आहे.
फोटाे:
दोन हजार सेवाधाऱ्यांच्या मदतीने वृक्षारोपण
पादुका संस्थान मुंडगाव चे ५३ गावांतील २००० पुरुष व महिला सेवाधारी व श्री भक्तांच्या मदतीने त्यांच्या गावात वृक्षारोपण तसेच श्रींच्या भक्तांना श्रीचा प्रसाद म्हणून एक प्रासादिक रोप देण्याचा मानस विश्वस्त मंडळाचा आहे. याआधी कोरोनाकाळात पादुका संस्थानद्वारे गरजूंना अन्नदान, निर्जंतुकीकरण, कोरोना जनजागृती, आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.