अकोट तालुक्यात आदिवासी शेतकरी दाम्पत्याने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:05 PM2021-07-18T16:05:17+5:302021-07-18T16:05:38+5:30
Farmer Suicide : दुबार पेरणी व कर्जबाजारीपणाचे कारण.
- विजय शिंदे
अकोटःअकोट तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या शहापूर रुपागड या गावात आदिवासी समाजाचे पती-पत्नीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना १८ जुलै रोजी दुपारी घडली. या पती-पत्नीने शेतात दुबारपेरणी केली शिवाय कर्जाचे आर्थिक विवंचनेत सापडल्याने आत्महत्या करण्यामागील प्राथमिक कारण असल्याची माहीती आहे.
हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शहापूर - रुपागड येथील मृतक पती सुरज तूकाराम भारसाकळे (वय ३५) व पत्नी कविता सुरज भारसाकळे (३०) यांच्या कडे अडीच एकर शेती आहे. या वर्षी त्यांनी शेतात निसर्गाच्या लहरीपणामुळे दुबार पेरणी केली. शिवाय कर्जाचा डोगंर वाढल्याने त्यांची परिस्थिती हलाखीची झाली होती. सतत आर्थिक विवंचनेत सापडल्याने मानसिक खालावलेला स्थितीत दोघांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. सदर घटना उघडकीस येताच त्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. पंरतु प्रकृती ढासळत असल्याने त्यांना अकोला रेफर करण्यात आले. पंरतु काळाने अकोला पोहचण्यापुर्वी झडप घातल्याने दोघांचा दुदैवी मृत्यु झाला. त्यांचे मागे असलेले लहान चिमुकले एक मुलगा व दोन मुली पोरके झाले आहेत.. मृतकचे सुरजच्या आईवडील,भाऊ यांचे यापूर्वीच निधन झाले आहे.
कोरोना लाँकडाऊनच्या काळात आर्थिक विवंचनेत असलेल्या या कुटुंबाने कपाशी व तुर पिकाची दुबार पेरणी केली. जुने कर्ज भरुन नवीन कर्ज उचलले होते. सतत आर्थिक परिस्थितीने हतबल झाल्याचे रुग्णालयात त्यांचे सोबत असलेले पोपटखेड येथील
नातेवाईक पांडुरंग तायडे यांनी सांगितले.
चौकट....
अकोट येथे उपजिल्हा रुग्णालय मंजुर केल्याचा गवगवा आमदार प्रकाश भारसाकळे हे दोन वर्षापासून करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय दर्जाचे कोणतेही उपचार होत नाहीत. त्यामुळे अनेक गंभीर रुग्णांना अकोला उपचारासाठी रेफर केले जाते. या रेफर मध्ये आज पुन्हा एका आदिवासी समाजाचे पती-पत्नीला वेळेवर उपचार न मिळाल्याने जिव गमवावा लागला.अकोट तालुक्याला सातपुडा जंगल परिसरातील आदिवासीबहुल गावे जोडली आहेत. सतत गंभीर घटना घडत असल्याने अकोट-अकोला रस्त्याची दुर्दशा व उपचाराअभावी अनेकांचे जीव गेले आहेत.