अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांनी केली निदर्शने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:03 PM2018-07-22T13:03:29+5:302018-07-22T13:05:03+5:30
मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अकोल्यातील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
अकोला: पुणे ते नाशिक पायदळ मोर्चातील विद्यार्थ्यांना अटक का करण्यात आली, यासंदर्भात चौकशी करण्यात यावी व डीबीटी योजना बंद करून वसतिगृहातील विद्यार्थ्याची दर्जेदार भोजनाची व्यवस्था करण्यात यावी यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अकोल्यातील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
डीबीटी योजना बंद करून वसतिगृहात दर्जेदार भोजनाची व्यवस्था करण्यात यावी, १३ जुलै रोजी काढण्यात आलेल्या पुणे ते नाशिक पायदळ मोर्चामधील विद्यार्थ्यांवर गैरकायदेशीररीत्या कारवाई करून अटक का करण्यात आली, यासंदर्भात चौकशी करण्यात यावी, आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या इमारती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात याव्या, आदिवासी विद्यार्थ्यांना नोकरी मिळेपर्यंत ५ हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात यावा व प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालयाची निर्मिती करण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. यावेळी नयन गायकवाड, अक्षय गायगोले, भूषण गुळदे, ज्ञानेश्वर सोळंके, राहुल खुळे, संतोष कदम, शुभम डाबेराव, अमोल गोदमले, रोहित कोडापे, धनराज मेश्राम, आशीष घासले, अजय सोळंके, मंगेश मरस्कोल्हे, देवानंद पाखरे, महादेव भोकरे, ऋतिक ठाकरे यांच्यासह इतर विद्यार्थी उपस्थित होते.