आदिवासी विद्यार्थ्यांनी सुरू केले बेमुदत उपोषण
By admin | Published: September 27, 2016 02:56 AM2016-09-27T02:56:14+5:302016-09-27T02:56:14+5:30
शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशाची आदिवासी विद्यार्थ्यांनी केली मागणी.
अकोला, दि. २६- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ांतील वसतिगृहांमध्ये सर्व नवीन अप्रवेशित विद्यार्थी विद्यार्थिनींना तत्काळ प्रवेश, वसतिगृहांची क्षमता वाढविणे तसेच प्रकल्प अधिकार्याची बदली या तीन मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवार, २६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. यावेळी ३४ विद्यार्थी उपोषणास बसले असून, त्यांच्या सर्मथनार्थ जवळपास दोन हजार विद्यार्थी उपोषण मंडपात उपस्थित होते.
अकोला, बुलडाणा व वाशिम या तीनही जिल्हय़ांतील बहुसंख्य आदिवासी विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. वसतिगृहात प्रवेश मिळविण्यापूर्वींं आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रथम महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, ही अट तिन्ही जिल्हय़ातील विद्यार्थ्यांंनी पूर्ण करून मोठय़ा संख्येने वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज सादर केले आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होऊन तीन महिने झाले असून, प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांंची एकही यादी अद्याप लावण्यात आलेली नाही. परिणामी, शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर राहणार्या आदिवासी विद्यार्थ्यांंवर वणवण भटकण्याची पाळी आली आहे. गत शैक्षणिक वर्षात अशीच परिस्थिती निर्माण झालेली असताना, केवळ विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून माजी प्रकल्प अधिकार्यांनी विद्यार्थ्यांंची वसतिगृह प्रवेश क्षमता १२५ वरून २९४ वाढविली होती. आदिवासी विद्यार्थ्यांंचा ओढा शिक्षणाकडे वाढत आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांंसमोर वसतिगृह निर्माण होणारा हा प्रश्न दूर करण्यासाठी अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ांतील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांच्या वसतिगृहांचा विस्तार करून विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढविण्याची मागणी आदिवासी विद्यार्थ्यांंनी केली आहे. अकोला जिल्हय़ातील वसतिगृहांची विद्यार्थी प्रवेश क्षमता एक हजाराने, तर बुलडाणा व वाशिम जिल्हय़ातील वसतिगृहांची क्षमता प्रत्येकी ५00 विद्यार्थी अशी वाढविण्याची मागणीसुद्धा या निवेदनात विद्यार्थ्यांंनी केली आहे. मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. या आंदोलनात तीन जिल्हय़ातील ११ शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.