अकोल्यातील वैद्यकीय पथकाकडून सातपुड्यातील आदिवासींची वैद्यकीय सेवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 01:08 PM2018-03-06T13:08:53+5:302018-03-06T13:08:53+5:30
सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी गावं आणि पाड्यातील अडीच हजार आदिवासींना अकोल्यातील वैद्यकीय पथकांकडून वैद्यकीय आणि औषधोपचार सेवा पुरविण्यात आली
खामगाव - सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी गावं आणि पाड्यातील अडीच हजार आदिवासींना अकोल्यातील वैद्यकीय पथकांकडून वैद्यकीय आणि औषधोपचार सेवा पुरविण्यात आली. यावेळी अडीच हजारावर आदिवासींची मोफत वैद्यकीय तपासणी तसेच १२६५ आदिवासी-वनवासी बांधवांना मोफत औषधीचे वितरण करण्यात आले. अकोला येथील शुभमं करोती फांऊडेशनच्यावतीने या शिबिरासाठी सुमारे अडीच लाख रुपयांचा खर्च करण्यात आला.
महात्मा गांधी लोकसेवा संघ, सालईबन परिवार आणि तरुणाई फांऊडेशनच्यावतीने सातपुड्याच्या पर्वतरांगेतील वडपाणी, बांडापिंपळ, चालठाणा, भिंगारा, गोमाल, चाळीस टापरी, गोरक्षनाथ, उमापूर, इस्लामपूर, चारबन, मेंढाचारी, कुंवरदेव, आमपाणी, सोनबर्डी, वसाडी, हड्यामाल, अंबाबरवा या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी-वनवासी गावांतील आदिवासींसोबतच मध्यप्रदेशातील बादलखोरा, चिल्लारा, आमलापाणी, करोली, जैसोंकी येथील सुमारे अडीच हजार आदिवासींची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सातपुड्याच्या पर्वंत रांगेतील हे सर्वात मोठे शिबिर रविवारी जळगाव जामोद तालुक्यातील सालईबन येथे पार पडले. सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत अकोला येथील डॉ. सदानंद भुसारी, डॉ. वैशाली डोसे, डॉ. वैशाली राठोड, डॉ. प्रवीण इंगळे, डॉ. योगेश पाटील, डॉ. ममता ठाकरे, डॉ. भारती मुठाळ, डॉ. धनश्री शिंदे, डॉ. पल्लवी रायबोले, डॉ. योगेश साहू, डॉ. श्रीपाद उजवणे, डॉ. स्वप्नील गावंडे, डॉ. अमित अग्रवाल, डॉ. सुनिल बिहाडे, डॉ. संजय पाटील, डॉ. विवेक खपली, डॉ. समीर देशमुख, डॉ. कुशल कवडे, पुष्पा रामागडे, संतोष खडसने, समाधान किरतकार, राहुल पोफडे, सदानंद शेगोकार, अनिल सूर्यवंशी, सचिन भालेराव, रवी सोनोने, वैभव पांडे, सुजित सरकटे, अमोल कुलट, सुशील इंगळे, कपिल मोरखडे, किशोर रत्नपारखी यांनी रुग्णतपासणी तसेच औषधोपचार सेवा दिली. आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी मनजीतसिंह शीख,नारायण पिठोरे, अविनाश सोनटक्के, सचिन ठाकरे, उमाकांत कांडेकर, अमोल तायडे, ग्यानसिंग खरत, तेजस छल्लाणी, विठ्ठल पवार, राजेंद्र कोल्हे यांच्यासह तरुणाई आणि सालईबन परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.
४१ तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा!
अकोला येथील शुभम करोती फांऊडेशनच्यावतीने ४१ तज्ज्ञ डॉक्टरांनी सालईबनात आदिवासी-वनवासींना सेवा दिली. यावेळी फिजीओथेरपी, होमिओपॅथी, आयुर्वेदीक तज्ज्ञांनीही उपस्थिती दर्शविली होती. तसेच आयसीयु तज्ज्ञांचीही उपस्थिती हे या शिबिराचे खास वैशिष्टे ठरले. यावेळी १२६५ आदिवासी-वनवासी बांधवांना लक्षावधी रुपयांच्या औषधीचे मोफत वितरण करण्यात आले. सातपुड्याच्या पर्वत रांगेतील हे सर्वात मोठे आरोग्य शिबिर ठरले.
अकोला येथील वैद्यकीय पथकाकडून सालईबन येथे आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी आदिवासींना मोफत औषधीही वितरीत करण्यात आली. यासाठी डॉक्टरांचे पथक, रुग्णवाहिका आणि अद्ययावत डिस्पेसरी व्हॅन सालईबनात उपलब्ध करण्यात आल्या होत्या. या आरोग्य शिबिराचा आदिवासी-वनवासी बांधवांना मोठा लाभ झाला.
- जगदीश खरत, सदस्य, सालईबन परिवार, चालठाणा(शांतीनगर)