देशभरातील शहीद पोलिसांना श्रद्धांजली
By admin | Published: October 22, 2016 02:47 AM2016-10-22T02:47:42+5:302016-10-22T02:47:42+5:30
पोलीस स्मृतिदिनी विविध कार्यक्रम; अकोला पोलीस दलाची मानवंदना
अकोला, दि. २२- गत वर्षभराच्या कालावधीत देशभरात पोलीस दलात कार्यरत असलेले जे पोलीस शहीद झाले त्यांना २१ ऑक्टोबर रोजी पोलीस मुख्यालय येथे आयोजित कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली. दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस शहीद पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्यात येतो.
अकोला पोलीस मुख्यालयात शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी शहीद पोलीस स्मृतिदिनी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर उपस्थित होते. पोलीस अधिकार्यांच्या हस्ते शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही या कार्यक्रमासाठी बोलाविण्यात आले होते. यासोबतच शांतता समिती सदस्य, शांतिदूत, पोलीस मित्र आणि पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी शहीद पोलिसांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित होते. आतापर्यंत हा कार्यक्रम शासकीय होता; मात्र यावर्षीपासून पोलीस स्मृती दिन कार्यक्रमात सर्वांनाच सहभागी करून घेण्यात येत असून त्यांनाही शहीद पोलिसांची माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला शेकडो पोलीस मित्र व शांतिदूत यांची उपस्थिती होती.
देशातील ४७३ पोलिसांना श्रद्धांजली
देशातील ४७३ पोलिसांना श्रद्धांजली शहीद पोलिसांच्या नावाचे वाचन यावेळी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी केले. गत वर्षभराच्या कालावधीत देशातील जे पोलीस शहीद झाले त्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. देशातील प्रत्येक पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली.