‘बॉटल नेक’चा तिढा शासन दरबारी
By admin | Published: July 6, 2017 12:54 AM2017-07-06T00:54:58+5:302017-07-06T00:54:58+5:30
रस्त्याची सीमारेषा स्पष्ट करा; मनपाचे नगररचना संचालकांना पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला आडकाठी ठरणाऱ्या इन्कम टॅक्स चौकातील ‘बॉटल नेक’चा (निमुळता भाग) तिढा शासन दरबारी पोहोचला आहे. रस्त्याची रुंदी २४ मीटर असताना एकाच बाजूच्या मालमत्तांना निष्कासित केल्या जाणार असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. यासंदर्भात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत दहा दिवसांपूर्वी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत गोरक्षण रोडची सीमारेषा स्पष्ट करण्याची मागणी मनपा प्रशासनाने थेट नगररचना विभागाच्या सहायक संचालकांकडे लावून धरली आहे. यासंदर्भात नगररचना संचालकांना पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता स्थानिक खासदार, पालकमंत्री तसेच आमदारांनी सर्वप्रथम रस्ते दुरुस्तीच्या कामाला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्ते विकासाची कामे शहराच्या भविष्याचा विचार करून अमलात आणावीत, अशी अकोलेकरांची रास्त अपेक्षा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला सुरुवात झाली असून, नेहरू पार्क ते संत तुकाराम चौकापर्यंत एकूण २ हजार ६३१ मीटर अंतर व १५ मीटर रुंदीचा रस्ता तयार होईल. त्याच्या मधात दीड फूट रुंदीचे दुभाजक व एलईडी पथदिवे लागतील. पहिल्या टप्प्यात नेहरू पार्क चौक ते गोरक्षण संस्थानपर्यंत १ हजार ३२० मीटर अंतराच्या रस्ते दुरुस्तीला सुरुवात झाली; मात्र पहिल्याच टप्प्यात महापारेषण कार्यालय ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंत ५०० मीटर अंतराच्या इन्कम टॅक्स चौकातील इमारतींमुळे रस्ता रुंदीकरणाला आडकाठी निर्माण झाली आहे. स्थानिक रहिवासी, व्यावसायिकांच्या इमारतींमुळे चक्क ५०० मीटर अंतरापर्यंत ‘बॉटल नेक’(निमुळता भाग) तयार होईल. गोरक्षण रस्त्याची रुंदी २४ मीटर असताना एकाच बाजूच्या इमारती निष्कासित होणार असल्याचा मुद्दा स्थानिक मालमत्ताधारकांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे उपस्थित केला. यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत मनपा आयुक्त अजय लहाने तसेच सहायक संचालक नगररचना विभाग, पुणे यांची बैठक पार पडली. गोरक्षण रोड रस्त्याची रुंदी इन्कम टॅक्स चौकात कशी कमी होते, त्याची सीमारेषा निश्चित करून दिल्यास ‘बॉटल नेक’चा विषय निकाली काढणे शक्य असल्याची भूमिका मनपा प्रशासनाने मांडली, तसेच यासंदर्भात सहायक संचालक, नगररचना विभाग, पुणे यांना पत्र दिल्याची माहिती आहे.
‘डीपी’ प्लाननुसार २४ मीटरचा रस्ता
शहर विकास आराखड्यानुसार (डीपी प्लान) गोरक्षण रोडची रुंदी २४ मीटर म्हणजेच ८० फूट अधिक आहे. मनपाच्या नकाशावर ही रुंदी नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम चौकापर्यंत एकसमान दाखविण्यात आली असताना इन्कम टॅक्स चौकात रस्त्याची रुंदी १५ मीटर कशी होते, असा सवाल उपस्थित होतो. याविषयी नगररचना विभागाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मनपाने लावून धरली आहे.
जमीन घेण्याचे मनपाला अधिकार
विकास कामांच्या आड येणारी खासगी जमीन, जागा ताब्यात घेण्याचे महापालिकेला अधिकार आहेत. गोरक्षण रोडवरील रहिवासी व व्यावसायिकांनी उभारलेले अनधिकृत बांधकाम मनपाने जमीनदोस्त केल्यास त्यासंदर्भात कोणताही दावा न्यायालयात टिकाव धरणार नाही. अशा स्थितीत संबंधित मालमत्ताधारकांनी शहर विकासाला हातभार लावण्याची गरज असल्याचा सूर उमटत आहे.