शिक्षकांच्या बदल्यांमध्ये घोळ; चौकशी समिती गठित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 02:34 PM2018-06-23T14:34:07+5:302018-06-23T14:35:38+5:30
अकोला : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदली प्रक्रियेतील घोळाची चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ)आदेशानुसार, शुक्रवारी पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.
अकोला : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदली प्रक्रियेतील घोळाची चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ)आदेशानुसार, शुक्रवारी पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अन्यायासंदर्भात तक्रारींची पडताळणी या समितीकडून करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदली प्रक्रियेत अनियमितता झाली असून, अनेक शिक्षकांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून करण्यात येत आहेत, तसेच यासंदर्भात शिक्षक संघटनांच्यावतीने शासनाकडेदेखील तक्रार करण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यांमधील घोळासंदर्भात, बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांवर अन्याय झाला, असे निदर्शनास आलेल्या शिक्षकांच्या तक्रारींची पडताळणी करून तथ्य जाणून घेण्यासाठी पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत गुरुवार, २१ जून रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदल्यांमधील घोळाच्या मुद्दयावर पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ ) कैलास पगारे यांनी शुक्रवार, २२ जून रोजी दिला. त्यानुसार चौकशी समितीमार्फत शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदल्यांमध्ये शिक्षकांवर झालेल्या अन्यायासंदर्भात पडताळणी करण्यात येणार आहे. चौकशी तातडीने पूर्ण करून अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेशही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी समितीला दिला आहे.
चौकशी समितीत ‘यांचा’ आहे समावेश!
जिल्हा परिषदेचे प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली असून, समितीचे सदस्य म्हणून उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष सोनी, निरंतर शिक्षणाधिकारी वैशाली ठग, प्राथमिक शिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार आणि दोन संगणक परिचालकांचा चौकशी समितीमध्ये समावेश आहे.
चौकशी समिती ‘या’ मुद्द्यांवर करणार तक्रारींची पडताळणी!
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदली प्रक्रियेत शिक्षकांनी संवर्गनिहाय शासनाच्या पोर्टलवर आॅनलाइन सादर केलेली माहिती, प्रत्यक्षात करण्यात आलेल्या बदल्या आणि बदल्यांमध्ये अन्यायासंदर्भात शिक्षकांच्या प्राप्त तक्रारी इत्यादी मुद्द्यांवर पाच सदस्यीय चौकशी समिती पडताळणी करणार आहे. या पडताळणीत आढळून येणाºया तथ्याच्या आधारे चौकशी समितीकडून ‘सीईओं’कडे अहवाल सादर करण्यात येणार आहे.