दारूच्या संशयावरून ट्रक पकडला, सापडली दारू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:22 AM2021-04-30T04:22:53+5:302021-04-30T04:22:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : राष्ट्रीय महामार्गावरून जात असलेल्या एका ट्रकमध्ये टोमॅटोच्या कॅरेटमागे दारू असल्याच्या माहितीवरून उत्पादन शुल्क विभागाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राष्ट्रीय महामार्गावरून जात असलेल्या एका ट्रकमध्ये टोमॅटोच्या कॅरेटमागे दारू असल्याच्या माहितीवरून उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी ट्रक ताब्यात घेतला. मात्र, ट्रकमधील टोमॅटोच्या कॅरेटमागील टाक्यांची तपासणी केली असता, त्यामध्ये दारूऐवजी पाणी निघाले. मात्र, पाणी असे चोरून नेण्यामागचा उद्देश काय, याचा तपास आता उत्पादन शुल्क विभाग करत आहे.
ट्रक क्रमांक (एमएच १२ एफझेड ८९२६)मधून दारूची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीवरुन उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ट्रकचा पाठलाग करून ट्रक ताब्यात घेतला. त्यानंतर टोमॅटोचे कॅरेट हटवून त्यामागे असलेल्या टाक्यांची तपासणी केली. मात्र, या टाक्यांमध्ये दारूऐवजी पाणी निघाले. त्यानंतर टोमॅटोच्या कॅरेटमागे एवढ्या गोपनीयरित्या टाक्यांमधून पाण्याची वाहतूक करण्यामागचा या ट्रकचालकाचा उद्देश काय, याची तपासणी आता उत्पादन शुल्क विभाग करत आहे. ट्रकमधील पाण्यावरून काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय उत्पादन शुल्क विभागाला असून, त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे. या ट्रकसोबत असलेल्या आणखी एका ट्रकमधून अशाच पद्धतीने दारूचा साठा नेल्याची माहिती आता प्राप्त होत आहे. या संदर्भात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.