बोगस सेंद्रिय खताची वाहतूक करणारा ट्रक जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 06:42 PM2020-06-16T18:42:54+5:302020-06-16T18:43:05+5:30
पोलिसांनी ट्रकमधील बोगस सेंद्रिय खताच्या १६0 बॅगसह ट्रक जप्त केला.
हिवरखेड: दानापूर-सौंदळा-हिवरखेड रोडवरील वान नदीजवळ बोगस सेंद्रिय खत विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह हिवरखेड पोलिसांनी छापा घातला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. पोलिसांनी ट्रकमधील बोगस सेंद्रिय खताच्या १६0 बॅगसह ट्रक जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कृषी विभागाच्या अधिकाºयांना मंगळवारी रात्री एमएच २६-एच-८१११ क्रमांकाच्या ट्रकमध्ये बोगस सेंद्रिय खत नेत असल्याची माहिती मिळाली. कृषी विभागाच्या अधिकाºयांनी हिवरखेड पोलिसांसह याठिकाणी छापा घालून ट्रक अडविला आणि ट्रकची तपासणी केली. ट्रकमध्ये प्रत्येकी ५0 किलो वजनाच्या १६0 बॅग असल्याचे दिसून आले. या बॅगांची तपासणी केली असता, त्यावर बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक आणि परवाना क्रमांक आढळून आला नाही. यामधील जिओगीन खत अवैधरीत्या सेंद्रिय खताचे उत्पादन करून विना परवानगी वाहतूक करून विक्री करून शेतकºयांची फसवणूक करीत असल्याचे आढळून आले. तेल्हाºयाचे कृषी अधिकारी मिलिंद ज्ञानदेव वानखडे यांच्या तक्रारीनुसार हिवरखेड पोलिसांनी रणजित प्रतापराव भंडारे(पुणे), में नर्मदा पोल्युशन सर्व्हिसेस पुणे सहकारी साखर कारखाना, बाभूळगाव ता. वसमत जि. हिंगोली आणि गणेश बाबाराव कºहाळे, रा. बोरी सावंत, ता. वसमत, ट्रकचालक किसन मुकुंदराव सावंत, रा. बोरी सावंत, ता. वसमत यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२0, सहकलम खत नियंत्रक आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलमनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ट्रकमधील १ लाख ६ हजार रुपये किमतीच्या खताच्या बॅगा आणि ट्रक असा एकूण १६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कृषी विभागाच्या भरारी पथकासह हिवरखेडचे ठाणेदार आशिष लव्हंगडे, पीएसआय विठ्ठल वाणी, गोपाल दातीर, संतोष सुरवाडे, आकाश राठोड यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)