मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करा! - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 06:20 PM2019-10-11T18:20:18+5:302019-10-11T18:21:46+5:30
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.
अकोला: जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, तसेच सेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्ष, सचिव यांनी आपापल्या सभासद व त्यांच्या कुटूंबियांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करुन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.
विधानसभा निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था, तसेच सेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्ष सचिव आदींची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी पापळकर यांच्या समवेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांनी आपापल्या संस्थेतील रहिवासी मतदारांना मतदानासाठी आवाहन करावे. तसेच त्यांनी मतदान केले की नाही याची त्यांना आठवण करुन द्यावी. या प्रयत्नातूनही मतदान करणारांचे प्रमाण वाढेल. शहरातील उच्चभ्रू वसाहतींत या प्रयत्नातून नक्कीच लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित करता येईल. तसेच ग्रामिण भागात सेवा संस्थांच्या माध्यमातून मतदारांना प्रोत्साहित करता येईल. या प्रयत्नातून आपण साº्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी केले.
जिल्हा उपनिबंधक लोखंडे यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधून त्यांना लोकशाही प्रक्रियेत योगदान देण्याचे आवाहन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांना मतदार जनजागृतीत योगदान देण्याचे आवाहन केले. या बैठकीस जिल्हाभरातून १५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.