बंदुकीच्या धाकावर व्यापा-याला लुटण्याचा प्रयत्न
By admin | Published: August 9, 2016 02:23 AM2016-08-09T02:23:13+5:302016-08-09T02:23:13+5:30
शेगाव येथील घटना; व्यापा-याची प्रसंगसावधनता; एका लुटारूस नागरिकांनी पकडले!
शेगाव (जि. बुलडाणा): एका व्यावसायिकाला बंदुकीच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न झाला; मात्र दक्ष नागरिकांच्या मदतीने सशस्त्र लुटारूंचा पाठलाग करून एका लुटारूस बंदुकीसह पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही चित्तथरारक घटना रविवारी रात्री उशिरा घडली.
रविवारी रात्री राकेश काशेलानी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून त्यांच्या दुचाकीने घरी परतत असताना अज्ञात दोन दुचाकीस्वारांनी त्यांना आवाज देऊन रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्या दुचाकीस्वारांनी पाठलाग करून काशेलानी यांच्या डोळय़ात मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र सुदैवाने त्यांच्या डोळय़ात मिरची पूड गेली नाही. काहीतरी अघटित घडणार याचा नेम आल्याने काशेलानी यांनी आपल्या वाहनाची गती वाढविली; मात्र राकेश काशेलानी यांची गाडी स्लिप झाली व काशेलानी घसरून पडले.
या संधीचा फायदा घेत दोन लुटारूंपैकी एकाने काशेलानी यांना काठीने मारहाण केली; मात्र काशेलानी यांनी प्रतिकार केला. हे पाहून दुसर्या लुटारूने त्याच्या जवळील बंदूक काढली; मात्र काशेलानी यांनी यावेळीसुद्धा प्रसंगावधान राखत त्याच्या हाताला झटका बंदूक खाली पाडली. दरम्यान, परिसरातील माणसेही घटनास्थळावर पोहचली. त्यांनी आरडाओरडा केला; मात्र दरम्यान दोघांपैकी एक जण दुचाकी घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.
पोलिसांची गाडी घटनास्थळी तत्काळ पोहचली व त्यांनी नागरिकांच्या ताब्यातील लुटारूला ताब्यात घेतले. पोलीस तपासात लटारूंची नावे अकोला जिल्ह्यातील दिलीप प्रभाकर साळुंके आणि राजू इंगळे अशी पुढे आली आहे. राजू इंगळे हा सध्या फरार असून पोलीस पथक त्याच्या शोधात रवाना झाले. आरोपीकडून एक बंदुक, चार जिवंत काडतुसे व एक चाकू असे हत्यार जप्त करण्यात आले आहे. घटनेतील आरोपींविरुद्ध कलम ३९४, ३२५, ४२५ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी सराईत गुन्हेगार
रंगेहात पकडलेल्या आरोपीकडून बुलडाणा जिल्ह्यात घडलेल्या लुटमारीच्या घटनांची माहिती मिळण्यास मदत होणार असून पोलिसांचे पथक दुसर्या आरोपीच्या शोधात रवाना झाले आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून अकोला जिल्ह्यात त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दखल आहेत.