खोटा जबाब नोंदविण्यासाठी लाभार्थींना ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:13 AM2020-12-07T04:13:53+5:302020-12-07T04:13:53+5:30
बार्शिटाकळी : तालुक्यात दुधाळ जनावरे व शेळी गट वाटपात पशुसंवर्धन अधिकारी व व्यापारी यांनी केलेली अनियमितता व भ्रष्टाचाराचे पितळ ...
बार्शिटाकळी : तालुक्यात दुधाळ जनावरे व शेळी गट वाटपात पशुसंवर्धन अधिकारी व व्यापारी यांनी केलेली अनियमितता व भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडू नये यासाठी आता लाभार्थींना चौकशी समितीसमोर खोटा जबाब नोंदविण्याकरिता प्रति लाभार्थी १२ हजार रुपये असे २ लाख रुपये दिल्याची चर्चा तालुक्यात आहे.
बार्शिटाकळी तालुक्यात पशुसंवर्धन विभागाने दुधाळ जनावरे व शेळी गट वाटप केले. यापैकी अनेक लाभार्थींनी कागदोपत्री लाभ घेतला. कुठलेही जनावरांची खरेदी-विक्री झाली नाही. उलट लाभार्थींचा हिस्सा व्यापाऱ्यांच्या बॅंक खात्यातून भरल्या गेला. लाभार्थींना १७ हजार नगदी देऊन उर्वरित रक्कम पशुसंवर्धन अधिकारी व व्यापारी यांनी संगनमत करून वाटून घेतली. अशी चर्चा आहे.
दुधाळ जनावरे व शेळी गट वाटपात झालेल्या अनियमता व भ्रष्टाचार तपासण्याकरीता जिल्हा परीषदेच्या चौकशी समितीने ज्या ज्या लाभार्थींचा लाभार्थी हिस्सा व्यापाऱ्यांनी स्वतःच्या बॅंक खात्यातून भरला. त्या त्या लाभार्थांना २७ नोव्हेंबरला पंचायत समिती बार्शिटाकळी येथे नोटीसद्वारे बोलाविले होते. सदर नोटीस पशुसंवर्धन विभाग बार्शिटाकळी यांनी अनियमितता करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. जेणेकरुन लाभार्थी मॅनेज केल्या जातील आणि झाले ही तसेच, व्यापारी व स्थानिक डॉक्टर जे पशूंचा विमा व्यवसाय करतात. त्यांनी लाभार्थींच्या घरी जाऊन प्रति लाभार्थी १२ हजार रुपये असे दोन लाख वाटप केल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
मला साडेअकरा हजार यावेळी दिलेत. पहिले म्हशी घेतल्या. त्यावेळी सतरा हजार मिळाले होते. आता साडेअकरा गुरुवारी मिळाले. डीडी व जनावराचा कान टोचण्याचा खर्च दीड हजार त्यांनी दाखविला.
विजय मनवर, लाभार्थीचा पती, लोहगड