क्षय रुग्णांची चाचणी शासकीय रुग्णालयात करणे बंधनकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 03:27 PM2020-01-07T15:27:16+5:302020-01-07T15:27:21+5:30

खासगी रुग्णालयांना क्षय रुग्णांचे नमुने तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 Tuberculosis test is mandatory in a government hospital! | क्षय रुग्णांची चाचणी शासकीय रुग्णालयात करणे बंधनकारक!

क्षय रुग्णांची चाचणी शासकीय रुग्णालयात करणे बंधनकारक!

Next

- प्रवीण खेते
अकोला : शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयातही क्षय रुग्णांचे निदान केले जाते; परंतु रुग्ण हा सेंसिटीव्ह आहे की रेजिस्टन्स, याचे योग्य निदान होत नाही. त्यामुळे आता खासगी रुग्णालयांना क्षय रुग्णांचे नमुने तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्यभरातील खासगी रुग्णालयांना निर्देशित करण्यात आले आहे.
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्ण शोध मोहिमेवर प्रामुख्याने लक्ष दिले जात असले, तरी रुग्ण हे सेंसिटीव्ह आहे की रेजिस्टन्स, याचे निदान होत नाही. विशेषत: खासगी रुग्णालयात रुग्णाला क्षयरोग असल्याचे निदान झाले तरी त्याच्यावर सेंसिटीव्ह रुग्ण म्हणूनच उपचार केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार टाळण्यासाठी आता प्रत्येक खासगी रुग्णालयाने त्यांच्याकडील क्षयरुग्णांच्या महत्त्वाच्या वैद्यकीय तपासण्या ‘सिबीनॅट’ मशीनद्वारे शासकीय रुग्णालयांमध्ये करणे बंधनकारक असल्याची माहिती सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे स्टेट टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा अकोला मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी सांगितले. शिवाय, खासगी रुग्णालयांनी क्षयरुग्णांना शासकीय रुग्णालयांकडे रेफर करण्यावर प्राधान्य द्यावे, असे निर्देशही राज्यभरातील सर्वच खासगी रुग्णालयांना दिल्याची माहिती त्यांनी दिली.

खासगी रुग्णालयांना नोंदणी आवश्यक
रेजिस्टन्स प्रकारात मोडणाऱ्या क्षयरुग्णावर खासगी रुग्णालयातच उपचार होत असल्यास, शासनातर्फे या रुग्णांसाठीही मोफत औषधोपचारही उपलब्ध करून दिला आहे; परंतु या सुविधेसाठी संबंधित खासगी रुग्णालयांनी शासकीय रुग्णालयांमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी केल्यावरच खासगी रुग्णालयातील रुग्णांना औषध नि:शुल्क मिळू शकते.

रेजिस्टन्स रुग्णांचा उपचार महागडा
सेंसिटीव्ह व रेजिस्टन्स असे दोन प्रकारचे क्षयरुग्ण असून, सेंसिटीव्ह रुग्णांवर सहा महिन्यांचा उपचार केला जातो. यासाठी केवळ सहा ते आठ हजारांचा खर्च येतो; मात्र रेजिस्टन्स रुग्णांवर दोन वर्षे उपचार चालत असून, त्यासाठी जवळपास दोन लाखांचा खर्च येतो. त्यामुळे खासगी रुग्णालयात रुग्णांना हा उपचार करणे शक्य नाही.

क्षयरोगमुक्त भारतासाठी रुग्णशोध मोहिमेसोबतच प्रत्येक रुग्णावर उपचार हे ध्येय आहे. प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळावा, यासाठी खासगी रुग्णालयातील क्षयरुग्णांच्या चाचण्या शासकीय रुग्णालयातच होणार आहेत. शिवाय, रुग्ण रेजिस्टन्स असेल, तरी त्यावर शासकीय रुग्णालयातच उपचार व्हावा, यासंदर्भात राज्यभरातील खासगी रुग्णालयांना कळविण्यात आले आहे.
- डॉ. शिवहरी घोरपडे,अध्यक्ष,स्टेट टास्क फोर्स, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

 

Web Title:  Tuberculosis test is mandatory in a government hospital!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.