आंबेडकरी चळवळीचे जुन्या पिढीतील निष्ठावान कार्यकर्ते तुकाराम डोंगरे यांचे निधन
By संतोष येलकर | Published: August 16, 2022 12:43 AM2022-08-16T00:43:33+5:302022-08-16T00:44:24+5:30
मुंबई येथील चैत्यभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी १९६४ मध्ये त्यांनी हातरुन येथील पोस्ट कार्यालयातून त्यावेळी ९ रुपयांची मनिऑर्डर पाठविली होती.
अकोला : आंबेडकरी चळवळीमधील जुन्या पिढीतील बाळापूर तालुक्यातल्या हातरून येथील निष्ठावान कार्यकर्ते तुकाराम डोंगरे यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. सोमवार, १५ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तुकाराम डोंगरे आंबेडकरी चळवळीतील शेड्युल कास्ट फेडरेशनचे कार्यकर्ते होते. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'प्रबुद्ध भारत' चे ते वार्षिक वर्गणीदार होते. मुंबई येथील चैत्यभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी १९६४ मध्ये त्यांनी हातरुन येथील पोस्ट कार्यालयातून त्यावेळी ९ रुपयांची मनिऑर्डर पाठविली होती.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाचे हातरुन ग्राम शाखेचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील जुन्या पिढीतील निष्ठावान कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे.