‘स्टिकर’ लावून ३५ रुपये किलो दराने विकली जाणार तूर डाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:19 PM2018-06-24T15:19:03+5:302018-06-24T15:21:33+5:30
अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना प्रतिकिलो ५५ रुपये दराने विकली जाणारी तूर डाळ ३५ रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणार आहे.
- संतोष येलकर
अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना प्रतिकिलो ५५ रुपये दराने विकली जाणारी तूर डाळ ३५ रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणार आहे. ५५ रुपये किंमत असलेल्या पाकिटावर आता ३५ रुपये प्रतिकिलो असे ‘स्टिकर’ लावून तूर डाळ विकली जाणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यात रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना यापूर्वी प्रतिकिलो ५५ रुपये दराने तूर डाळीचे वितरण करण्यात येत होते; मात्र रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये प्रतिकिलो दराने वाटप करण्यात येत असलेली तूर डाळ प्रतिकिलो ३५ रुपये दराने वितरित करण्याचा निर्णय शासनामार्फत ५ जून रोजी घेण्यात आला. त्यानुषंगाने गत २० जून रोजी मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यातील रास्तभाव दुकानांमध्ये आणि शासकीय धान्य गोदामांमध्ये शिल्लक असलेल्या तूर डाळीच्या पाकिटांवर ५५ रुपये प्रतिकिलो दर नमूद असल्याने, या तूर डाळीच्या पाकिटांवर ३५ रुपये प्रतिकिलो दर असे ‘स्टिकर ’लावून रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना तूर डाळ विकण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. त्यानुसार स्टिकर लावून ३५ रुपये प्रतिकिलो तूर डाळ रास्तभाव दुकानांमधून विकण्याचा आदेश शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत २० जून रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाºयांना देण्यात आला. त्यानुसार आता रास्तभाव दुकानांमध्ये शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये प्रतिकिलो दराच्या पाकिटावर ३५ रुपये प्रतिकिलो दराचे स्टिकर लावून तूर डाळीचे वितरण करण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार जिल्ह्यात रास्तभाव दुकानांमध्ये ५५ रुपये प्रतिकिलो दराच्या तुरीच्या पाकिटावर ३५ रुपये प्रतिकिलो दराचे ‘स्टिकर’ लावून शिधापत्रिकाधारकांना तूर डाळीचे वितरण करण्यात येणार आहे.
- संतोष शिंदे
जिल्हा पुरवठा अधिकारी