तूर तेजीत! अकोला, अकोटात ११,५०० रुपये प्रति क्विंटल
By रवी दामोदर | Published: August 19, 2023 04:37 PM2023-08-19T16:37:00+5:302023-08-19T16:37:31+5:30
यंदा सुरुवातीपासूनच तुरीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे.
अकोला : यंदा सुरुवातीपासूनच तुरीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीला मागणी वाढताच सातत्याने तुरीचा दर वाढत असून, शनिवार, दि. १९ ऑगस्ट रोजी अकोला बाजार समितीसह अकोट बाजार समितीत तुरींनी विक्रम गाठला. पहिल्यांदा तुरीला प्रति क्विंटल ११,५०० हजार रुपयांवर पोहोचली आहे. परंतु आता शेतकऱ्यांजवळील साठवणूक केलेली तूर संपल्यानंतर दरवाढ झाली असल्याने वाढीव दराचा फायदा केवळ व्यापाऱ्यांनाच होणार असल्याची चिन्हे आहेत.
सध्या बाजार समितीत तुरीची आवक कमी झाली व मागणी वाढली आहे. परदेशातून तुरीची आयात कमी झाली आहे. अशा परिस्थितीत नवीन तूर बाजारात यायला सहा महिन्यांचा कालावधी आहे. याशिवाय गतवर्षी झालेल्या अतिपावसाने तुरीच्या उत्पादनात कमी आलेली आहे. देशात सगळीकडे हीच परिस्थिती असल्याने तुरीची मागणी वाढताच भाव कडाडले आहेत. येथील बाजार समिती एक प्रकारे तुरीचे हब बनली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक भाव मिळत असल्याने व इतर तालुक्यांच्या तुलनेत जास्त भाव असल्याने येथे तुरीची मोठी आवक राहते; परंतु सध्या शेतकऱ्यांजवळ साठवणूक केलेली तूर नसल्याने बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक कमी झाली आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने दरवाढ झालेली आहे.
यंदाही अतिवृष्टीचा फटका, उत्पादनावर परिणाम
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे ४४ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. पावसाचे पाणी शेतात थांबल्याने तुरीचे पीक नष्ट झाले आहे. याशिवाय मान्सूनच्या विलंबाने तीन आठवडे पेरण्या रखडल्या होत्या. त्यामुळे कपाशीची क्षेत्रवाढ झाली. पर्यायाने सोयाबीनमध्ये आंतरपीक असणारे तुरीचे क्षेत्र काही प्रमाणात कमी झाले आहे. पावसाचा खेळखंडोबा पाहता यंदा तुरीच्या उत्पादनात सरासरी कमी येण्याची शक्यता आहे.
सध्या बाजार समितीत तुरीची आवक कमी झाली आहे. सध्या शेतकऱ्यांजवळही माल नाही, नवीन तुरीला सहा महिने आहेत. त्यामुळे मागणी वाढून तुरीची भाववाढ झाली आहे. काही दिवस तुरीच्या दरात तेजी राहण्याचा अंदाज आहे. - चंद्रशेखर खेडकर, अध्यक्ष, व्यापारी-अडतिया मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला.