अकोला जिल्ह्यात रेशन दुकानांतून तूरडाळ गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 10:47 AM2021-02-02T10:47:32+5:302021-02-02T10:47:56+5:30
Akola News गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात रेशन दुकानांतून तूरडाळ गायब झाली आहे.
अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्थाअंतर्गत रेशनकार्डधारकांना तूरडाळीचा साठा शासनाकडून मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात रेशन दुकानांतून तूरडाळ गायब झाली आहे. त्या आनुषंगाने तूरडाळ मिळणार तरी केव्हा, याबाबत जिल्ह्यातील ४ लाख १७ हजार २४१ लाभार्थी रेशनकार्डधारकांडून प्रतीक्षा केली जात आहे.
सार्वजिनक वितरण व्यवस्थाअंतर्गत पात्र रेशनकार्डधारकांना दरमहा गहू, तांदळासोबतच तूरडाळीचे वितरण करण्यात येते. जिल्ह्यात एकूण ४ लाख ३९ हजार ८६१ रेशनकार्डधारक असून, त्यापैकी ३ लाख १ हजार ५२९ केशरी रेशनकार्डधारक व १ लाख १५ हजार ७१२ पिवळे रेशनकार्डधारकांना रेशन दुकानांमधून धान्याचे वितरण करण्यात येते. जिल्ह्यातील पात्र रेशनकार्डधारकांना गत नोव्हेंबरपर्यंत रेशन दुकानांतून गहू व तांदळासोबतच तूरडाळीचे वितरण करण्यात आले. परंतु गत तीन महिन्यांपासून रेशनकार्डधारकांना तूरडाळ वाटप करण्यासाठी शासनाच्या पुरवठा विभागामार्फत तूरडाळीचा साठा मंजूर करण्यात आला नाही. रेशनकार्डधारकांना तूरडाळीचे वितरण करण्यासाठी जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये तूरडाळीचा साठा उपलब्ध झाला नसल्याने, रेशन दुकानांमधून रेशनकार्डधारकांना तूरडाळीचे वितरण बंद आहे. त्यामुळे रेशन दुकानांतून तूरडाळीचे वितरण केव्हा सुरू होणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील ४ लाख १७ हजार २४१ रेशनकार्ड लाभार्थींकडून केली जात आहे.
रेशनवर मिळते गहू, तांदूळ
जिल्ह्यातील रेशन दुकानांतून पिवळे रेशनकार्डधारक व केशरी रेशनकार्डधारकांना सद्य:स्थितीत दरमहा केवळ गहू व तांदळाचे वितरण करण्यात येत आहे. तूरडाळीचे वितरण करण्यासाठी शासनाकडून तूर डाळीचा साठा मंजूर नसल्याने रेशनकार्डधारकांना तूरडाळीचे वितरण बंद आहे.
जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना दरमहा गहू व तांदळाचे वितरण करण्यात येत आहे. गत नोव्हेंबरपासून तूरडाळीचा साठा शासनाकडून मंजूर नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रेशन दुकानांतून रेशनकार्डधारकांना तूरडाळीचे वितरण बंद आहे. शासनाकडून तूरडाळीचा साठा प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना तूरडाळीचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.
- बी. यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी