तूर उत्पादक शेतकरी हतबल!
By admin | Published: April 14, 2017 01:42 AM2017-04-14T01:42:49+5:302017-04-14T01:42:49+5:30
अकोला- ‘नाफेड’द्वारे खरेदी बंद करण्यात येत असल्याने, तूर कोठे आणि कोणाला विकणार, या विवंचनेत जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
‘नाफेड’ची खरेदी उद्यापासून बंद!
संतोष येलकर - अकोला
हमी दराने तूर विक्री करण्यासाठी ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवर गत दीड महिन्यांपासून उभ्या असलेल्या ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप अद्याप झाले नसताना, खरेदी १५ एप्रिलपासून बंद करण्यात येत आहे. बाजारात व्यापाऱ्यांकडून तुरीला योग्य भाव मिळत नसताना ‘नाफेड’द्वारे खरेदी बंद करण्यात येत असल्याने, तूर कोठे आणि कोणाला विकणार, या विवंचनेत जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये हमीदराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यात अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या एका खरेदी केंद्रावर तूर खरेदी करण्यात येत असून, अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा या चार ठिकाणी खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येत आहे. खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, त्या तुलनेत तूर खरेदीची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. बारदान्याचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या इत्यादी कारणांमुळे तूर खरेदीत वारंवार अडथळा निर्माण होत असून, खरेदी केंद्रांवर तुरीच्या मोजमापासाठी प्रचंड विलंब होत आहे. खरेदी केंद्रांवर तुरीच्या मोजमापासाठी शेतकऱ्यांना एक-दीड महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत २६ फेबु्रवारीपर्यंत नोंदणी झालेल्या ४०० ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप १३ एप्रिलपर्यंत रोजी होऊ शकले नाही. गत दीड महिन्यांपासून बाजार समिती परिसरात तुरीचे ट्रॅक्टर मोजमापाच्या प्रतीक्षेत उभे असतानाच १५ एप्रिलपासून ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी करण्यात येणार आहे. बाजारात व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विंटल ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपये दराने तूर खरेदी केली जात आहे. बाजारात तुरीला योग्य भाव मिळत नसताना, नाफेडद्वारे हमी दराने तूर खरेदी बंद करण्यात येत असल्याने, तूर कोणाला विकणार, असा प्रश्न जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
सायंकाळी काटा होणार बंद!
मोजमापाच्या प्रतीक्षेत शेकडो तुरीची वाहने उभी असतानाच १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता काट बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्रांवर गत दीड महिन्यांपासून आणलेली तूर कोणाला विकणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
टोकन दिलेल्या तूर खरेदीचे काय?
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात १२० ट्रॅक्टरमधील तुरीच्या मोजमापासाठी शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहे; मात्र १५ एप्रिलपासून नाफेडमार्फत तूर खरेदी बंद होत आहे, त्यामुळे टोकन देण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचे काय, असा प्रश्न आहे.
शेतकऱ्यांच्या तुरीची आवक होईल, तोपर्यंत खरेदी करण्यात यावी, अशी भूमिका यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची गरज असून, त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे.
- संजय धोत्रे, खासदार
नाफेडद्वारे तूर खरेदी १५ एप्रिलपासून बंद करण्यात येत असली तरी, बाजार समितीमध्ये असलेल्या सर्व ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप करून खरेदी करण्यात आली पाहिजे. खरेदीसाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली पाहिजे.
- शिरीष धोत्रे, सभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती
खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात आहे; गत दीड महिन्यांपासून तुरीचे मोजमाप करण्यात आले नाही. मोजमापाच्या प्रतीक्षेत असतानाच नाफेडमार्फत तूर खरेदी बंद करण्यात येत आहे. नाफेडद्वारे खरेदीला मुदतवाढ मिळाली पाहिजे.
- गजानन पावसाळे, उपाध्यक्ष, अकोला तालुका खरेदी-विक्री संघ
नाफेडद्वारे तूर खरेदी १५ एप्रिलपासून बंद करण्यात येत असल्याबाबत महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालकांचे पत्र १२ एप्रिल रोजी प्राप्त झाले. त्यानुसार खरेदी बंद करण्यात येणार आहे.
- जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी