ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पीक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:33 AM2020-12-16T04:33:51+5:302020-12-16T04:33:51+5:30
राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बंद पडल्यामुळे रस्त्यावर खोदून ठेवलेले खड्डे तसेच कायम ...
राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात
बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बंद पडल्यामुळे रस्त्यावर खोदून ठेवलेले खड्डे तसेच कायम सोडून दिल्यामुळे अपघात वाढले आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्ढे बुजविण्याची मागणी होत आहे.
रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
दहिहांडा : दहिहांडा ते दहिहांडा फाटापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. रस्त्यावरील गिट्टी व डांबर निघून गेल्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
पिंजर गावात अस्वच्छतेचे साम्राज्य
पिंजर : पिंजर गावात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नियमित स्वच्छता होत नाही. नाल्या तुंबल्या आहेत. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. गावात स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गावातील पथदिवे बंद, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
भांबेरी: गावातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे अंधार पसरला आहे. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासकाने गावातील पथदिवे सुरू करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावरील धुळीमुळे पिकांचे नुकसान
आगर : अकोला ते अकोट राज्यमार्गाचे काम रखडले आहे. कंत्राटदाराने रस्ता खोदून ठेवल्यामुळे धूळ साचली आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावरील धूळ लगतच्या शेतांमधील पिकांवर उडत आहे. त्यामुळे कपाशी, तूर व हरभरा पिकांचे नुकसान होत आहे.
नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
हिवरखेड : येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. तसेच कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ अकोला नॉर्थ व आनंदीलाल चिराणिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिनेश बजाज, सुनील इंगळे यांनी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात डाॅ. जुगल चिराणिया, डॉ. सुरेश तारे यांनी तपासणी केली. अध्यक्षस्थानी गोविंदराव इंगळे होते. उद्घाटक ठाणेदार धीरज चव्हाण होते. अतिथी संतोष बजाज होते.
वृद्धाश्रमात औषधीचे वितरण
मूर्तिजापूर : येथील वृद्धाश्रमात सोमवारी आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक औषधांचे वितरण करण्यात आले. कोरोना आणि हवामानातील बदल संसर्गाच्या दृष्टिकोनातून रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी मलाई पुरा, टांगा चौक, चंद्रशेखर आझाद चौक, महादेव मंदिर, वृद्धाश्रम परिसरातील नागरिकांना औषधांचे वितरण करण्यात आले.
किरकोळ वादातून एकास मारहाण
बाळापूर : किरकोळ वादातून दोघांनी एकास मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.
रिधोरा येथील रामेश्वर दौलतराव तराळे यांना किरकाेळ वादातून अजय रामदास बोराखडे, आकाश रोकडे यांनी मारहाण करून जखमी केेले. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ढाबे, हॉटेल्सवर दारूची अवैध विक्री
कुरूम : राष्ट्रीय महामार्गावरील ढाबे, हॉटेल्सवर देशी, विदेशी दारूची अवैध विक्री होत आहे. परवाना नसतानाही हॉटेल, ढाबामालक जादा दराने दारूची विक्री करीत असल्याचे चित्र आहे. परंतु याकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पीक विम्यापासून शेतकरी वंचित
अडगाव बु. : शेतकऱ्यांनी गतवर्षी पिकांचा विमा काढला. यंदासुद्धा मूग, उडीद, सोयाबीन आणि कपाशी पिकांचा विमा काढला. अतिवृष्टीमुळे यंदा मूग, उडीद व सोयाबीन पिकांचे मोेठे नुकसान झाले. परंतु, अद्यापपर्यंत परिसरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही.
एटीएम सुरू करण्याची मागणी
आलेगाव : आलेगाव मोठ्या लोकसंख्येचे गाव असूनही गावात एकाही बँकेचे एटीएम केंद्र नाही. त्यामुळे नागरिकांना बँकेत रांगेत ताटकळत उभे रहावे लागते. गावात एटीएम सुरू केल्यास गावातील आणि लगतच्या गावांमधील नागरिकांना सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे गावात एटीएम सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पीक कर्जासाठीच्या जाचक अटी रद्द करा!
मुंडगाव : शासनाकडून विविध शासकीय योजनांतर्गत बँकांमार्फत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो. मात्र, कर्जपुरवठा करताना बँकांनी जाचक अटी व नियम लावल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही त्यात त्रुटी काढण्यात येतात. त्यामुळे जाचक अटी रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नाल्या तुंबल्या, डासांचा प्रादुर्भाव वाढला
माना : गावातील नाल्या तुंबल्या आहेत. गावात कचरा साचला आहे. नाल्यांमधील सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने नाल्यांची सफाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
बाळापूर: तालुक्यातील गावांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक होत आहेे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनांमध्ये बसविण्यात येत आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे काम केव्हा होणार
पारस : राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक महिन्यांपासून बंद आहे. ठिकठिकाणी रस्त्यांचे तुकडे करून ठेवल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कामास केव्हा सुरुवात होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.