हळदीला सर्वाधिक कर्क्युमिन; शेतकऱ्याला २२ लाखांचे उत्पन्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:20 AM2021-09-27T04:20:30+5:302021-09-27T04:20:30+5:30
पास्टूल येथील संतोष घुगे यांची किमया: पातूर तालुक्यात बहरतेय हळद! संतोषकुमार गवई पातूर: तालुक्यातील मोर्णेच्या पायथ्याशी हळद बहरत असल्याचे ...
पास्टूल येथील संतोष घुगे यांची किमया: पातूर तालुक्यात बहरतेय हळद!
संतोषकुमार गवई
पातूर: तालुक्यातील मोर्णेच्या पायथ्याशी हळद बहरत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील शेतकरी हळदीला पसंती देत असून, पेरा वाढला आहे. पास्टूल येथील शेतकरी संतोष नामदेवराव घुगे यांनी हळदीचे भरघोस उत्पादन घेत ‘पिकेल ते विकेल’ या उपक्रमांतर्गत घरीच विक्री करून, २२ लाख रुपयांचा नफा मिळविला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी पिकविलेल्या हळदीला सार्वाधिक ७.२९ कर्क्युमिन मिळाले आहे. साधारण हळदीला कर्क्युमिन हे केवळ २ ते ३ पर्यंत मिळते.
पास्टूल येथील शेतकरी संतोष नामदेव घुगे यांनी इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतला असून, ते आधुनिक शेतीकडे वळले आहेत. त्यांनी वडिलोपार्जित पडीक रानावर जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या हळदीची बाग फुलविली. तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी रिसर्च वायगाव डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सुधारित वाणाची पेरणी केली. योग्य पद्धतीने नियोजन करून, त्यांनी हळदीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे, तसेच त्यांना ‘पिकेल ते विकेल’ या शासनाच्या उपक्रमाचा लाभ झाला आहे. दरम्यान, घुगे यांनी केलेल्या नियोजनामुळे हळदीला सर्वाधिक कर्क्युमिन मिळविण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.
------------------------------
काय आहे कर्क्युमिन?
कर्क्युमिन हे एक चमकदार पिवळे रसायन आहे. जे कर्कुमा लोंगा प्रजातींच्या वनस्पतींनी तयार केले आहे. हे हळदीचे मुख्य कर्क्युमिनॉइड आहे, आले कुटुंबातील सदस्य, झिंगिबेरेसी. हे हर्बल सप्लिमेंट, कॉस्मेटिक्स घटक, अन्नाची चव आणि खाद्य रंग म्हणून विकले जाते.
---------------------------
अनेक आजारांवर केला जातो उपचार
सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतलेल्या हळदीमध्ये ॲन्टी व्हायरल ॲन्टी बॅक्टेरियल तत्त्व अधिक असतात. हळदीमुळे गुडघेदुखी, सांधेदुखी, मधुमेह, कॅन्सर सर्दी, खोकला, वात आदी आजारांवर उपचारार्थ वापर होतो.
---------------------
सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या हळदीला बाजारात विक्री करण्याची गरज पडली नाही. अनेकांनी घरूनच हळदीची खरेदी केली आहे. शासनाने हळदीला जी आय मानांकन द्यावे.
संतोष नामदेव घुगे, शेतकरी, पास्टूल.
------------------------
पास्टूल येथील शेतकऱ्याच्या हळदीत सर्वाधिक कर्क्युमिन मिळाले असून, त्यांना ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत चांगले उत्पन्न झाले आहे. शेतकऱ्यांनीही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.
- डी.एस.शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर.
-----------------------