कृषी विद्यापीठ पदभरती परीक्षा रद्द झाल्याने गोंधळ
By admin | Published: January 11, 2016 01:55 AM2016-01-11T01:55:07+5:302016-01-11T01:55:07+5:30
रात्री उशिरा मिळाले संदेश; परीक्षा केंद्रावर सूचना नाही
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत घेण्यात येत असलेल्या पदभरती परीक्षेच्या वेळापत्रकानुसार रविवारी आयोजित चालक व मेकॅनिक या पदाची परीक्षा ऐन वेळेवर रद्द करण्यात आली. परीक्षार्थींना परीक्षा रद्द झाल्याचे संदेश शनिवारी मध्यरात्रीनंतर पाठविण्यात आल्याने अनेक परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले. परंतु, येथे परीक्षा नसल्याचे समजल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नियोजित वेळापत्रकानुसार ३ जानेवारीपासून या पदभरती परीक्षेला सुरुवात करण्यात आली असून, रविवारी १0 जानेवारी रोजी चालक/मेकॅनिक या पदासाठीची परीक्षा नियोजित होती. या परीक्षेसाठी अकोल्यासह वाशिम, बुलडाणा, बीड, यवतमाळ तसेच जवळपासच्या जिल्ह्यातील एकूण ७४९ परीक्षार्थी पात्र ठरले आहेत. या परीक्षार्थींना ऑनलाइन पद्धतीने प्रवेशपत्रदेखील वितरित करण्यात आले होते. रविवारी परीक्षा असल्याने परीक्षार्थींनी तयारीला सुरुवात केली. परंतु, ऐन परीक्षेच्या आधी शनिवारच्या मध्यरात्रीनंतर परीक्षा रद्द झाल्याचे संदेश परीक्षार्थींंच्या मोबाइलवर आले. हे संदेश खोटे असतील म्हणून परीक्षार्थींनी याकडे लक्ष न देता नियोजनानुसार रविवारी थेट परीक्षा केंद्र गाठले. परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर, येथे कुठल्याही प्रकारची परीक्षा नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत तशी सूचना नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली.