तुषार पुंडकर हत्याकांड : मारेकरी टप्प्यात; तीन पथकांकडून शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 01:38 PM2020-03-06T13:38:34+5:302020-03-06T13:38:44+5:30
लवकरच ते पोलिसांच्या तावडीत सापडतील. असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
अकोट: प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्येचा तपास अत्यंत बारकाईने करण्यात येत असून, हत्याकांडातील मारेकरी पोलिसांच्या टप्प्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे हत्याकांडाची उकल रविवारपर्यंत होण्याची शक्यता आहे. पोलिसांचे एक पथक भुसावळला जाण्याची शक्यता असून मारेकऱ्यासंबधी पोलीस पुरावे गोळा करीत आहेत.
तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहर पोलीस स्टेशन वसाहतीत गोळीबार करून २१ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. हत्याकांडाचा पोलीस बारकाईने तपास करीत असून, त्यासाठी तीन पोलीस पथक कार्यरत आहेत. यामध्ये तुषार पुंडकर यांच्या हत्येमागील कारण, गोळीबार करणारे व सुपारी देणारा आरोपी, या तिन्ही बाजंूनी तपासाची चक्रे फिरविली जात आहेत. डम्पडाटा तपासणीसह अनेकांची उलट तपासणी करून जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. या तपासात काही दिवसांपूर्वी कबुतरी मैदानावर देशीकट्टासंबंधी घटना घडली होती. या घटनेसंदर्भात पोलिसांनी दोन-तीन जणांची कसून विचारपूस केली. देशीकट्टा व तुषार पुंडकर यांचे छायाचित्र कोणाकडून आले. देशीकट्टा कुठून आला. या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. हत्याकांडाशी संबधित तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक एका जणाला घेऊन भुसावळला जाण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या एकंदरीत तपासातून हत्याकांडातील आरोपी रडावर आले असून, लवकरच ते पोलिसांच्या तावडीत सापडतील. असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)