निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:51+5:302021-07-20T04:14:51+5:30
अकोला : नुकताच दहावीचा घवघवीत निकाल लागला. आता बारावीचा निकाल लागायचा आहे. परंतु विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल कसा लागेल. याचीच ...
अकोला : नुकताच दहावीचा घवघवीत निकाल लागला. आता बारावीचा निकाल लागायचा आहे. परंतु विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल कसा लागेल. याचीच चिंता सतावत आहे. निकालाच्या ३०-३०-४० या सूत्राने विद्यार्थ्याची झोप उडविली आहे. दहावी-अकरावीच्या गुणांचा आधार घेऊन शिक्षण मंडळाकडून कसा निकाल लागेल. याची चिंता विद्यार्थ्यांना आहे.
बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० टक्के म्हणजे दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के आणि बारावी ४० टक्के असे ठरले आहे. तिन्हीचे मिळून विद्यार्थ्यांना ॲव्हरेज गुण मिळणार आहेत. याचाच फटका तर बसणार नाही ना! अशी चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे. यंदा दहावीचा कधी नव्हे असा ऐतिहासिक निकाल लागला. काही अपवाद वगळता, १०० टक्के विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. विद्यार्थ्यांना गुण सुद्धा चांगले देण्यात आले. परंतु आता बारावीचा निकाल कसा लागणार, याची चिंता आहे. कारण बारावीचा निकाल दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० आणि बारावीचे ४० टक्के याआधारे लागणार आहे. त्यामुळे चांगले गुण मिळतील की नाही, दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण मिळून एकूण निकाल कसा तयार करतील, कोणत्या पद्धतीने गुण देतील, याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना सतावत आहे.
जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी - ४३२
जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी स्टेट बोर्ड -२४८०९
विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा
दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण मिळून निकाल लागणार आहे. आता या तीन वर्गांमध्ये चांगले गुण मिळाले असतील, तर बारावीतही चांगले गुण मिळतील. परंतु या तीन वर्गात कमी गुण मिळाले असतील, तर बारावीत कसे चांगले गुण मिळतील. याची चिंता आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती वाटते. परंतु बारावीत ४० टक्क्यांचे सूत्र आहे. त्यामुळे चांगले गुण मिळतील, अशी अपेक्षा आहे.
- संचित शैलेश शिरसाट, विद्यार्थी (फोटो)
बारावीच्या निकालाविषयी मनात धाकधुक तर आहेच, परंतु मला दहावी, अकरावीमध्ये चांगले गुण मिळाले असल्यामुळे बारावी परीक्षेत ९० टक्क्यांवर गुण मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु आता ३०-३०-४० या सूत्रानुसार निकाल कसा लागतो, किती टक्के मिळतात, याविषयी उत्सुकता आहे.
- समृद्धी विलास डहाके, विद्यार्थिनी (फोटो)
३० टक्के सूत्र गणित बिघडविणार!
३०-३०-४० या सूत्रानुसार निकाल कमी लागण्याची शक्यता आहे. दहावी, अकरावीत कमी गुण असतील, तर याचा बारावीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतु आम्ही विद्यार्थ्यांना चांगले गुण देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये.
- माधव मुन्शी, प्राचार्य, न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय
३०-३०-४० असे सूत्र असले तरी, बोर्डाने बारावीतील ४० टक्के गुण देण्याचा निर्णय घेतला असून, तो चांगला आहे. दहावीत सर्वच विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळालेले आहेत. परंतु विद्यार्थी अकरावी सहजतेने घेतात. परंतु चिंता करण्याची गरज नाही. बारावीचा निकालही उत्कृष्टच लागेल.
- प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, उपप्राचार्य, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय