बारावी निकालाचा पेच; अकरावी रेस्ट इयर समजलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:14 AM2021-07-08T04:14:23+5:302021-07-08T04:14:23+5:30

गतवर्षी मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतरही कोरोनाचा ...

Twelfth result patch; Loss of eleventh rest year students? | बारावी निकालाचा पेच; अकरावी रेस्ट इयर समजलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान?

बारावी निकालाचा पेच; अकरावी रेस्ट इयर समजलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान?

googlenewsNext

गतवर्षी मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने विद्यार्थ्यांसाठी शाळा बंदच होत्या. यंदाही पहिली ते बारावीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या. मूल्यमापनानुसार गुणदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. बारावी निकालाचा तिढा सोडविताना, राज्य शिक्षण मंडळाने मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर केले आहे. बारावीचा निकाल तयार करण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर मुख्याध्यापक आणि प्राचार्यांसह कमाल सात सदस्य असलेली निकाल समिती स्थापन केली जाणार आहे. दरम्यान, मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर झाल्याने आणि बारावीचे प्रॅक्टिकल झाले नसल्याने, तसेच गतवर्षी अकरावीची परीक्षादेखील झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वर्तविली जात आहे.

बारावीसाठी असे होणार गुणदान

मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर झाले. यात दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या वर्षभरातील सत्र परीक्षा, सर्व चाचण्या आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्क्यांच्या गुणांच्या अंतर्भाव राहणार आहे.

बारावीतील विद्यार्थी २४८०९

गेल्यावर्षी अकरावीच्या परीक्षाच झाल्या नाहीत...

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.

अकरावीच्या परीक्षाच झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले याचा लेखाजोखा नाही. त्यामुळे बारावीचे गुणदान करताना अकरावीतील गुण नेमके कोणत्या आधारावर ग्राह्य धरण्यात येतील, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला आहे.

बारावीला अंतर्गत गुण कोठे असतात?

यंदा बारावीचे प्रॅक्टिकल झाले नाही, बारावीला अंतर्गत गुणही नाहीत. त्यामुळे अंतर्गत गुणानुसार गुणदान कसे होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सत्र परीक्षा, चाचण्यादेखील ऑनलाईन पद्धतीने झालेल्या आहेत. त्यामुळे अंतर्गत गुण देताना प्राध्यापकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता

आमच्या महाविद्यालयाने व्यवस्थित अभ्यासक्रम पूर्ण केला. अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकल घेतले. आता अंतर्गत मूल्यमापन करून गुण दिले जाणार आहेत. महाविद्यालयातील प्राध्यापकांवर पूर्ण विश्वास आहे. ते नक्कीच चांगले गुण देतील. थोडीबहुत चिंता वाटते. परंतु, कोरोनामुळे दुसरा काेणताही पर्याय नसल्यामुळे प्रथमच अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

- मैथिली विशाल बावस्कर, विद्यार्थिनी.

महाविद्यालयाकडून ऑनलाईन पद्धतीने चांगले शिक्षण मिळाले. परीक्षा रद्द झाली. याचे शल्य आहेच. परंतु, दुसरा पर्यायही नव्हता. महाविद्यालयाने प्रॅक्टिकल, अंतर्गत परीक्षा घेऊन मूल्यमापन केले. त्यामुळे चांगले गुण मिळतील अशी अपेक्षा आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना निश्चितच त्यांच्या गुणवत्तेनुसार गुण मिळतील. त्यांचे नुकसान होणार नाही.

- संस्कृती दीपक खारोडे, विद्यार्थिनी

कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. परीक्षा रद्द झाली. मूल्यांकनाशिवाय पर्याय नाही. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले. शिक्षकांना विद्यार्थ्यांची गुणवत्ता माहिती आहे. केवळ बारावीच्या आधारे मूल्यमापन करून गुण द्यावेत. याबाबत बोर्डाने मार्गदर्शन करून गुणदान करण्याची पद्धतसुद्धा सांगितली आहे. त्यात अडचण नसावी. - प्रा. प्रकाश डवले, प्राचार्य, डवले महाविद्यालय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अपरिहार्यता म्हणून प्राप्त परिस्थितीत इयत्ता बारावीसाठी निश्चित करण्यात आलेली मूल्यमापन पद्धती योग्य वाटते. जे विद्यार्थी या योजनेनुसार प्राप्त गुणांबाबत असमाधानी असतील त्यांना श्रेणी सुधारण्यास संधी देण्यात यावी.

- आनंद साधू, प्राचार्य, एन. टी. घैसास महाविद्यालय

अकरावी तर ‘रेस्ट इयर’

दहावीनंतर अकरावीचे वर्ष म्हणजे ‘रेस्ट इयर’ समजून अनेक विद्यार्थी आपली वाटचाल ठेवतात. अकरावीत असताना बारावीचे क्लासेस लावतात. आता मात्र बारावीच्या गुणदान प्रक्रियेत अकरावीचे गुण ग्राह्य धरण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.

अकरावीला रेस्ट इयर समजणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीतील गुणाचा सर्वाधिक फटका बारावीच्या निकालाला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

Web Title: Twelfth result patch; Loss of eleventh rest year students?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.