बारा लाखांची रोकड जप्त; व्यापारी ताब्यात!
By admin | Published: April 14, 2017 01:48 AM2017-04-14T01:48:16+5:302017-04-14T01:48:16+5:30
अकोला: मोटारसायकलवर १२ लाख रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या एका चांडक नामक व्यापाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने गुरुवारी रात्री ताब्यात घेतले.
रोकड हवालाची असल्याचा संशय: एलसीबीची कारवाई
अकोला: मोटारसायकलवर १२ लाख रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या एका चांडक नामक व्यापाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने गुरुवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत व्यापाऱ्याची पोलीस चौकशी करीत होते. व्यापाऱ्याकडील रोकड हवाला किंवा सावकारी व्यवहारासाठीची असल्याचा पोलिसांना संशय आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक कैलास नागरे यांना टिळक रोडजवळील मारवाडी प्रेस गल्लीतून एक चांडक नामक व्यापारी मोटारसायकलवर १२ लाख रुपयांची रोकड नेत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने मारवाडी प्रेस गल्लीतून व्यापाऱ्यास ताब्यात घेतले आणि त्याला स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणले. या ठिकाणी त्याच्याकडील रोकड जप्त करण्यात आली. ही रोकड कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. व्यापाऱ्याकडील ही रोकड हवालातील असल्याचा किंवा त्याने सावकारी व्यवसायासाठी ही रोकड आणली असावी, असा पोलिसांना संशय आहे. रात्री उशिरापर्यंत व्यापाऱ्याची कसून चौकशी करण्यात येत होती. व्यापाऱ्यानेसुद्धा रोकडच्या व्यवहारासंबंधीचे कागदपत्र दाखविण्याची तयारी दर्शविली होती. पोलिसांनी रोकडबाबतची माहिती आयकर विभागाला दिली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकूर, शेरअली खान, संदीप काटकर, अमित दुबे यांनी केली.
चांडक नामक व्यापारी १२ लाख रुपयांची रोकड नेत होता. त्याला ताब्यात घेऊन रोकड जप्त करण्यात आली. आयकर विभागालाही माहिती देण्यात आली. चौकशी सुरू आहे.
- कैलास नागरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा