अकोला जिल्ह्यातील बारा शाळांना १५ लाखांचे शैक्षणिक साहित्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:33 PM2019-12-01T12:33:39+5:302019-12-01T12:33:45+5:30
आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांशी संलग्नित चार शाळांसह इतर आठ शाळांना शुक्रवारी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यात आले.
अकोला: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे आणि शाळा, शिक्षकांनासुद्धा चांगले शिक्षण देता यावे, या उद्देशाने महाबीजच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून तब्बल १५ लाख रुपयांची शाळांना मदत करण्यात आली. या निधीतून जिल्ह्यातील चार आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांशी संलग्नित चार शाळांसह इतर आठ शाळांना शुक्रवारी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यात आले.
शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणीकृत तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण प्राप्त व्हावे, या उदात्त हेतूने प्रेरित होऊन महाबीज अकोला यांनी औद्योगिक सामाजिक बांधीलकी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील दर्जेदार गुणवत्ता असणाºया १२ शाळांची निवड करण्यात आली. या निवड करण्यात आलेल्या शाळांमध्ये शिकणाºया गोरगरीब व शेतकऱ्यांच्या मुलांना डिजिटली स्मार्ट बनविण्यासाठी शाळेला १५ लाख रुपये किमतीचे इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले, संगणक संच, एलईडी, यूपीएस, प्रोजेक्टर, अॅन्ड्रॉइड टॅब उपलब्ध करून देण्यात आले. शुक्रवारी महाबीजच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाबीज व्यवस्थापक अनिल भंडारी होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, डाएटचे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे, महाबीजच्या संचालक अनिता चोरे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते निवडक शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमामध्ये महाबीजचे व्यवस्थापक अनिल भंडारी यांनी सीएसआर फंड निर्माण केला असून, या फंडातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणार आहे. जिथे शैक्षणिक साहित्याची मदत हवी असेल, तिथे आम्ही देण्याचा प्रयत्न करू, असे मत व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनीसुद्धा शैक्षणिक साहित्यातून विद्यार्थी, शाळेची प्रगती साधा आणि गुणवत्ता दाखवा तर पालक जि.प. शाळांकडे वळतील, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन डाएटचे भाषा सहायक जितेंद्र काठोळे यांनी केले. कार्यक्रमाला महाबीजचे सचिव विनय वर्मा यांच्यासह जिल्हा परिषद व आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नित शाळेचे मुख्याध्यापक व तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते.
या शाळांना मिळाले शैक्षणिक साहित्य
महाबीजच्या ‘सीएसआर’ फंडामधून बार्शीटाकळी तालुक्यातील जि.प. शाळा सिंदखेड, बाळापूर तालुक्यातील जि.प. शाळा वाडेगाव, पातूर तालुक्यातील जि.प. शाळा दिग्रस, अकोट तालुक्यातील जि.प. शाळा बोर्डी आणि जि.प. उर्दू शाळा मलकापूर, शासकीय अभ्यास शाळा, डाबकी, जि.प. शाळा किनखेड, जि.प. शाळा हाता, जि.प. शाळा सारकिन्ही, जि.प. शाळा मधापुरी, जि.प. शाळा अंधारसांगवी, जि.प. शाळा आडसूळ या शाळांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.