पत्नीस पळविणार्या पतीस कारावास
By admin | Published: February 24, 2017 02:38 AM2017-02-24T02:38:23+5:302017-02-24T02:38:23+5:30
आरोपीला सात दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
अकोला, दि. २३- पतीच्या जाचाला कंटाळून माहेरी राहणार्या पत्नीस मोठी उमरी भागातील संस्कार कॉन्व्हेंट समोरून पळवून नेल्याप्रकरणी आठवे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांनी आरोपी पती प्रकाश अनंतराव हागे याला सात दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
प्रकाश हागे याने ओमनी कार क्रमांक एम एच१२ - ५७६७ मधून पत्नीस २८ जून २0१0 रोजी आरोपीने बळजबरीने गाडीत कोंबून नेले होते. सदरहू महिलेने अकोट फैल भागातून आपली सुटका करून घेतल्यानंतर सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात धाव घेतली व पोलिसांना आपबीती सांगितली. महिलेने तक्रारीत असे म्हटले की, आरोपी प्रकाश हा काहीच कामधंदा करत नसल्यामुळे आमच्यात पटत नव्हते.
अशातच त्याने मानसिक छळ करणे सुरू केल्यामुळे मी माहेरी चाळीस क्वॉटर देशमुख कॉलनी गुडधी रोड येथे राहत होती. घटनेच्या दिवशी बहिणीच्या मुलीस घराजवळ असलेल्या कॉन्व्हेंटमध्ये सोडण्यासाठी आली असता आरोपी प्रकाश येथे आला व माझा मुलगा कोठे आहे, या कारणावरून माझ्याशी वाद घातला व मला गाडीत कोंबले. महिलेच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी कलम ३४२ चा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यातील विशेष सरकारी अभियोक्ता सीमा शालीग्राम लोड यांनी सरकारची बाजू मांडताना सहा साक्षीदार तपासले. न्यायालयासमोर आलेले साक्षपुरावे व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी प्रकाश हागे याला सात दिवसांच्या कारावासाची व दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीने दंड न भरल्यास पुन्हा सात दिवस शिक्षा भोगावी लागेल, असेही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.