सिंधी कॅम्पमधून अडीच लाखांचा गुटखा जप्त
By admin | Published: November 23, 2014 01:26 AM2014-11-23T01:26:06+5:302014-11-23T01:26:06+5:30
अकोला पोलिसांची कारवाई, अन्न व औषध प्रशासन विभागाची भूमिका संशयास्पद.
अकोला - राज्यात गुटखा बंदी होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला, मात्र जिल्हय़ात अद्यापही गुटख्याचा काळाबाजार मोठय़ा प्रमाणात सुरू असून, याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अन्न व औषध प्रशासनाने एकाही ठिकाणावरून गुटखा जप्त केला नसून, गत एक महिन्याच्या कालावधीत पोलिस अधीक्षकांच्या पथकाने तब्बल चौथ्यांदा गुटखा जप्तीची कारवाई केली. सिंधी कॅम्पमधून या पथकाने शनिवारी तब्बल अडीच लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असून, यावरून अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सिंधी कॅम्पमधील कच्ची खोली परिसरात असलेल्या दीपक मो तीराम बुलाणी यांच्या निवासस्थानाच्या तळमजल्यात असलेला तब्बल २ लाख २६ हजार रुपयांचा गुटखा पोलिस अधीक्षकांच्या पथकाने जप्त केला. या गुटख्यामध्ये विमल पान मसाल्यासह बाबा तंबाखू व इतर महागड्या गुटख्याचे पाकीट होते.
१0 ते ११ पोते गुटखा पोलिस अधीक्षकांच्या पथकाने जप्त केल्याने जिल्हय़ात अद्यापही मोठय़ा प्रमाणात गुटख्याची विक्री सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
अन्न व औषध प्रशासनाने गत आठवड्यातच तब्बल ४२ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. त्यानंतर चार ते पाच दिवसांनंतरच अडीच लाखांचा गुटखा जप्त केल्याने अद्यापही गुटख्याची मोठय़ा प्रमाणात उलाढाल सुरू असल्याचे दिसून येते. सिंधी कॅम्पमधील एक मोठा गुटखा माफिया आता पोलिसांच्या रडारवर असून, त्याच्या साथीदारांचीही माहिती पोलिस अधीक्षकांच्या पथकाने घेतल्याची माहिती आहे.