लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोघा आरोपींना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2017 01:57 AM2017-04-20T01:57:07+5:302017-04-20T01:57:07+5:30
अकोला : दहा वर्षीय मुलीला वासनेची शिकार बनविणाऱ्या शेख मुत्सेद्दीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी आणि मोहसीन कुरेशी मो. अन्वर कुरेशी यां दोघा आरोपींना पोलीस कोठडी.
अकोला : दहा वर्षीय मुलीला वासनेची शिकार बनविणाऱ्या शेख मुत्सेद्दीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी आणि मोहसीन कुरेशी मो. अन्वर कुरेशी यांना मंगळवारी अटक केल्यानंतर त्यांनी बुधवारी दुपारी नवव्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एम.डी. नन्नावरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
शनिवारी शाळा आटोपल्यानंतर दहा वर्षीय मुलगी प्लास्टिक वेचण्यासाठी त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्समध्ये गेली. या ठिकाणी माळीपुऱ्यातील गोविंद परशुराम साखरे (५३) याने तिला कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावर जाण्यासाठी पैसे दिले आणि चौथ्या माळ्यावरही तुला पैसे मिळतील, असे सांगितले. पैशांच्या लोभापायी ही मुलगी चौथ्या माळ्यावर गेली. या ठिकाणी सुभाष चौक येथील शेख मुत्सेद्दीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी (१९) आणि मोहसीन कुरेशी मो. अन्वर कुरेशी (२० रा. ताजनापेठ) यांनी तिला पकडले आणि तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार झालेली आणि रक्ताने कपडे माखलेली मुलगी पाहून कॉम्प्लेक्समधील व्यापाऱ्यांचे तिच्यावर अत्याचार झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सर्वप्रथम गोविंद साखरे याला रविवारी अटक केली; मात्र न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. पोलिसांनी संशयित आरोपींनाही अटक केली; परंतु प्रमुख आरोपींचा शोध लागत नव्हता. मंगळवारी पोलिसांनी शेख मुत्सेद्दीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी आणि मोहसीन कुरेशी मो. अन्वर कुरेशी यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यावर न्यायालयाने दोघांनाही २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ मंगला पांडे यांनी बाजू मांडली.