महात्मा फुले महाविद्यालयात अडीच कोटींचा घाेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:17 AM2021-04-16T04:17:50+5:302021-04-16T04:17:50+5:30
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार सन २००३-४ दरम्यान कायम विना अनुदान तत्त्वावर महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालय, पातूर येथे अनुदान ...
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार सन २००३-४ दरम्यान कायम विना अनुदान तत्त्वावर महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालय, पातूर येथे अनुदान तत्त्वावर सुरू केले.
हे महाविद्यालय ६ जून २०१३ रोजी वेतन अनुदानासाठी पात्र ठरले. नोव्हेंबर २०१७ पर्यंत संस्थेने कर्मचाऱ्यांना वेतन दिले, असे असताना संस्थेचे प्राचार्य व १० कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयाशी संगनमत करून संस्थेच्या अध्यक्षांना अंधारात ठेवून ६ जून २०१३ च्या पूर्वीच्या दिनांकापासून वेतन प्राप्तीसाठी पात्र आहे, असे खोटे सांगून खोटे थकीत वेतन देयक तयार करून ते खरे आहे, असे भासवून ३ एप्रिल २०२१ रोजी शासनाकडून तब्बल दोन कोटी ५६ लाख ५८ हजार २१ रुपये एवढी थकीत वेतन राशी मिळवली, असे तक्रारीत म्हटले आहे़ संबंधित राशी महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या खात्यावर बँक ऑफ महाराष्ट्र गांधी रोड शाखा अकोला येथे जमा आहे. त्यामुळे संबंधित खाते गोठवण्यात यावे, असे पत्र संस्थाध्यक्षांनी संबंधित बँकेच्या व्यवस्थापकास ५ एप्रिल २०१९ रोजी दिले. यासंदर्भात संस्थाध्यक्षांनी व्हाॅट्सॲप आणि संस्थेच्या ई-मेलवरून प्राचार्यांना कळवले की, माहे नोव्हेंबर २०१७ पूर्वी म्हणजे शासकीय वेतन नियमितपणे सुरू होण्याच्या पूर्वी म्हणजे सहा जून २०१३ ते माहे ऑक्टोबर २०१७ पर्यंत संस्थेद्वारे कर्मचाऱ्यांना दिलेल्या वेतनाची रक्कम संस्थेच्या खात्यावर जमा करावी, अशी सूचना दिली. यासंदर्भात सहसंचालक उच्चशिक्षण अमरावती विभाग अमरावती यांनाही कळवले. मात्र, प्राचार्यांनी संदर्भात उडवाउडवीची उत्तरे देणारे पत्र अध्यक्षास पाठवले. त्यामुळे संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संस्थाध्यक्ष बोचरे यांनी लेखी तक्रारीद्वारे पातूर पोलिसांत केली. पातूर पोलिसांत दाखल केलेल्या लेखी फिर्यादीसोबत शासन कायम विनाअनुदानित आदेश, शासन अनुदानाचा आदेश, अर्जदारांना कळविण्याचे पत्र, बँकेला दिलेले पत्र, कर्मचाऱ्यांची थकबाकीचे विवरणपत्र, गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेले पत्र, सहसंचालक यांचे पत्र, महाविद्यालयाने सादर केलेला थकीत वेतनासाठी प्रस्ताव, महाविद्यालयाने एचटीसी सेवार्थ प्रणालीवर सादर केलेला प्रस्ताव सदर फिर्यादीसोबत जोडल्याचे संस्थाध्यक्ष बोचरे यांनी सांगितले. संस्था आणि कर्मचारी यांच्यात निर्माण झालेला वाद शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी या उद्देशाला या वादामुळे हरताळ फासला जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशी पालकांची इच्छा आहे़
------काेट---------
थकीत वेतनासाठी संबंधित सर्व प्रस्ताव शासनाकडे सादर केलेले आहेत. यासंदर्भात मला भाष्य करायचे नाही़
-किशोर वाट, प्राचार्य, म. फुले कला व विज्ञान महाविद्यालय, पातूर
------काेट-------
महाविद्यालयाचे प्राचार्य आहरण व संवितरण अधिकारी असतात. २०१३-१७ या दरम्यान नॅकचे मूल्यांकन सुरू हाेते़ त्यामुळे वेतन बाकी हाेते़ गतवर्षी कोरोनामुळे वेतन थकीत होते. संस्थेत अंतर्गत वाद आहेत़ त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत़ यासंदर्भात एका आठवड्यात चौकशी समिती नेमली जाणार आहे़
-केशवराव तुपे, सहसंचालक शिक्षण विभाग, अमरावती़
--------कोट----------
प्राचार्य आणि काही कर्मचाऱ्यांनी संगनमत करून जून 2013 पूर्वीची खोटी वेतन देयके सादर करून अनुदान लाटले, संस्थेची आणि शासनाची संबंधितांनी फसवणूक केली आहे़
-सुभाष बोचरे
अध्यक्ष म. फुले शिक्षण प्रसारक मंडळ, पातूर