बनावट कागदपत्रे जोडणाऱ्या दोघांना अटक
By admin | Published: May 4, 2017 12:53 AM2017-05-04T00:53:44+5:302017-05-04T00:53:44+5:30
अकोला : अवैध सावकाराविरुद्ध केलेल्या तक्रारीमध्ये बनावट कागदपत्रे जोडून फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी बुधवारी सकाळी तीन जणांपैकी दोघांना अटक केली.
एक फरार: दोन आरोपींना उद्यापर्यंत कोठडी
अकोला : अवैध सावकाराविरुद्ध केलेल्या तक्रारीमध्ये बनावट कागदपत्रे जोडून फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी बुधवारी सकाळी तीन जणांपैकी दोघांना अटक केली. दोघांना बुधवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
बाभूळगाव जहागीर येथील विठ्ठल प्रल्हाद वक्टे याने उपनिबंधक कार्यालयामध्ये देवीदास भीमराव उबाळे यांच्यासह राजेंद्र विठ्ठल वानखडे, अनिल हनुमानदास काबरा आणि नारायण दांदळे यांच्याविरुद्ध तक्रार देऊन त्यांच्यावर अवैध सावकारीचा व्यवसाय करीत असल्याचा आरोप केला होता. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वक्टे याने उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारीसोबत महत्त्वाच्या कागदपत्रांसह प्रतिज्ञापत्रसुद्धा जोडले होते; परंतु हे कागदपत्र व प्रतिज्ञापत्र बनावट असल्याची तक्रार उबाळे, वानखडे यांनी उपनिबंधक कार्यालयाकडे केली होती. त्यानंतर तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान वक्टे याने सादर केलेल्या कागदपत्र व प्रतिज्ञापत्राची तपासणी केली. तपासणीमध्ये प्रतिज्ञापत्राची (स्टॅम्प पेपर) खरेदी आणि करार केल्याची तारीख जुळत नसल्याचे स्पष्ट झाले, तसेच करारनाम्यावर बनावट स्वाक्षरी असल्याचे उघड झाले. त्यामुळे विठ्ठल वक्टे याची तक्रार तालुका उपनिबंधकांनी खारीज केली आणि अवैध सावकारीविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीसोबत जोडलेली कागदपत्रे बनावट असल्यामुळे आणि प्रतिज्ञापत्रावरील खरेदी आणि कराराची तारीख जुळत नसल्याने सुरेखा फुपाटे यांनी मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात विठ्ठल प्रल्हाद वक्टे, खिरपुरी येथील वासुदेव प्रभूजी कवडकार आणि किनखेड येथील मुद्रांक विक्रेता प्रकाश अजाबराव शेळके यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार तिघा जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ (३४) नुसार गुन्हा दाखल केला. बुधवारी पोलिसांनी खिरपुरी येथील वासुदेव कवडकार, मुद्रांक विक्रेता प्रकाश शेळके यांना अटक केली. विठ्ठल वक्टे हा फरार आहे. त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अनिल जुमळे करीत आहेत.