पोळा चौकातील होळी विझविणारे दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:19 AM2021-04-01T04:19:56+5:302021-04-01T04:19:56+5:30
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोळा चौकातील उदासी महाराज मठासमोर २८ मार्चला हिंदूंचा सण होळी साजरी करण्यात ...
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोळा चौकातील उदासी महाराज मठासमोर २८ मार्चला हिंदूंचा सण होळी साजरी करण्यात येत असताना काही असामाजिक तत्त्व असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी या होळीवर पाणी टाकून विझविली. त्यामुळे हिंदूधर्मियांच्या भावना दुखावल्या. याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींना अटक केली.
पोळा चौकातील उदासी महाराज मठासमोर हिंदूधर्मियांचा सण असलेल्या होळीचे पूजन करून होळी पेटविली. मात्र, त्यानंतर या परिसरातील काही गुंडप्रवृत्तीच्या युवकांनी धार्मिक भावना दुखावत दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होळीवर पाणी टाकून ते होळी विझविली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी जुने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी तातडीने या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. त्यानुसार याच परिसरातील रहिवासी अफरोज व नबी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी होळीवर पाणी टाकल्याची कबुली दिली तसेच या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून आणखी काही आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
शिवसेना आक्रमक
दरम्यान, एका हिंदूंच्या मंदिरासमोरील होळी विझविल्याने गटनेता राजेश मिश्रा यांनी तातडीने जुने शहर पोलीस स्टेशन गाठले. ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्याशी चर्चा करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. यावेळी गटनेता राजेश मिश्रा यांच्यासह नगरसेवक गजानन चव्हाण शिवसैनिक व या परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भाजपचे एसपींना निवेदन
या गंभीर घटनेची माहिती मिळताच भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा व जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांच्यासह महापौर अर्चना मसने, जयंत मसने, विजय अग्रवाल, विलास शेळके, यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.