शेतकऱ्याला एक लाखांना लुटल्याप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:19 AM2021-03-31T04:19:26+5:302021-03-31T04:19:26+5:30
दीड लाखांचा मुद्देमाल जप्त खेट्री : पातुर तालुक्यातील मळसूर येथील विलास यशवंत काळे हे हरभरा विक्री करून अकोल्याहून परत ...
दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
खेट्री : पातुर तालुक्यातील मळसूर येथील विलास यशवंत काळे हे हरभरा विक्री करून अकोल्याहून परत घरी येत असताना, समोरून येणाऱ्या मोटारसायकलस्वराने विलास काळे याला एक लाखांना लुटल्याची घटना २६ मार्च रोजीच्या रात्री घडली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली असून, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शेतकरी विलास काळे यांनी २७ मार्च रोजी पातूर पोलिसात फिर्याद दिली की, ते अकोला येथून हरभरा विक्री करून एक लाख रुपयांची रोकड घेऊन पातूरमार्गे मळसूरकडे येत असताना, अकोला पातूर मार्गवरील भंडाराज फाट्याजवळ समोरून येणाऱ्या मोटारसायकलवर अज्ञात दोघांनी काळे याला चाकू लावून एक लाख रुपये लुटले. या प्रकरणात २७ मार्च रोजी पातूर पोलिसांनी अज्ञात दोघे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख व त्यांचे तपास पथकातील कर्मचारी यांनी तांत्रिक विश्लेषणावरून वाशिम येथील विजय भोलाप्रसाद गुप्ता २६, लखन अरुण गवळी १९, या दोघांना ३० मार्च रोजी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख, प्रमोद डोईफोडे, अश्विन शिरसाट, फिरोज खान, शक्ती कांबळे, मनोज नागमते, संदीप ताले, स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे.