अमरावती शहरातील दोन दुचाकी चोरल्या: आपातापा येथे कारवाई
By नितिन गव्हाळे | Published: August 24, 2023 07:33 PM2023-08-24T19:33:30+5:302023-08-24T19:33:38+5:30
दर्यापूर मार्गे येत होते दोघे, पोलिसांनी पकडले तर झाला खुलासा!
अकोला: अमरावती शहरातून दोन पल्सर मोटारसायकल चोरून दर्यापूर मार्गे अकोला शहराकडे येत असताना, गुरूवार २४ ऑगस्ट रोजी दुपारी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आपातापाजवळ त्यांना अडविले आणि दुचाकींची विचारणा केली असता, दोघांनी दोन्ही दुचाकी चोरून आणल्याचा खुलासा झाला. पोलिसांनी त्यांना अटक करून दोन दुचाकी हस्तगत केल्या.
अमरावती येथुन काळया रंगाच्या दोन पल्सरची चोरी करून दर्यापुर मार्गाने दोन युवक अकोल्याकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथक पाठवून ग्राम आपातापा येथे दोन पल्सर दुचाकी चालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील दुचाकींची विचारपुस केली असता, या दोन्ही दुचाकी त्यांनी अमरावती शहरातून चोरल्याचे समोर आले. पोलिसांनी जितेंद्र मन्साराम चव्हाण(२८) उमरा ता. अकोट व विजय बाळु मोहिते(१९) रा. टाकरखेड ता. चिखली जि. बुलढाणा यांना अटक करून त्यांच्याकडून एमएच २७ सीआर ४५७९, एमएच २७ डीके ८९५३ क्रमांकाच्या दुचाकी हस्तगत केल्या. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
......................................
भरधाव येत होते, चोरटे
अमरावती शहरातून दोन पल्सर चोरल्यानंतर जितेंद्र चव्हाण व विजय मोहिते हे दर्यापूर मार्गाने अकोला शहराकडे भरधाव येत होते. पोलिसांनी त्यांना थांबविताच, त्यांची चौकशी केली तर दोघांही भंबेरी उडाली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर दुचाकी चोरीची घटना समोर आली. ही कारवाई पीएसआय गोपाल जाधव, एएसआय दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, लिलाधर खंडारे, अन्सार अहेमद, स्वप्नील खेडकर, प्रशांत कमलकार यांनी केली.