खेलो इंडिया युथ चॅम्पियन स्पर्धेत अकोल्याच्या दोन बॉक्सरांना कांस्य पदक
By रवी दामोदर | Published: October 7, 2023 05:29 PM2023-10-07T17:29:23+5:302023-10-07T17:33:01+5:30
बॉक्सिंग क्षेत्रात जिल्ह्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव चमकविले असून, पुन्हा दोघांनी पदके प्राप्त केल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
अकोला : भारतीय खेल प्राधिकरण, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हरियाणातील रोहतक येथे राष्ट्रीय बॉक्सिंग एकेडमीत आयोजित खेलो इंडिया युथ चॅम्पियनशीप स्पर्धेत अकोल्याच्या दोन बॉक्सरांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत दोघांनी कांस्य पदकावर नाव कोरले आहे. बॉक्सिंग क्षेत्रात जिल्ह्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव चमकविले असून, पुन्हा दोघांनी पदके प्राप्त केल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
हरियाणा राज्यातील रोहतक येथे खेलो इंडिया युथ चॅम्पियन स्पर्धा रंगली असून, स्पर्धेत अकोला क्रिडा प्रबोधनीचे तन्मय कलंत्रे, रेहान शाह यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ४८ किलो वजन गटात तन्मय कलंत्रे व ५७ किलो वजन गटात रेहान शाह यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून कांस्यपदकावर नाव करले. यापूर्वी सुद्धा राज्यस्तरीय स्पर्धेत तन्मय कलंत्रे यांनी राज्य स्तरीय स्पर्धेत सुवर्ण व रेहान शाह याने ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत रजत पदक प्राप्त केले होते. शहरातील वसंत देसाई स्टेडीयम मध्ये असलेल्या क्रीडा प्रबोधनीत ते बॉक्सिंगचे धडे गिरवित आहेत. त्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी तथा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सतीश भट्ट, सहयोगी प्रशिक्षक अदित्य मने यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
देशात ठरले तिसरे बॉक्सर
खेलो इंडिया युथ चॅम्पियन स्पर्धेत राज्यासह देशभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. ४८ किलो गटात कलंत्रे व रेहान शाह ५७ किलो गटात शानदार प्रदर्शन करून देशातील तिसरे बॉक्सर ठरले आहेत.