अकोटातील दोन गुन्हेगारी टोळ्या दोन वर्षासाठी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 10:26 AM2021-06-10T10:26:54+5:302021-06-10T10:27:01+5:30
Two criminal gangs in Akot deported for two years : अकोटातील दोन गुन्हेगारी टोळ्यांना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
अकोला : जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या अकोटातील दोन गुन्हेगारी टोळ्यांना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या दोन्ही टोळ्यांतील आरोपींमध्ये पाच जणांचा समावेश आहे. आतापर्यंत पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्ह्यातील सुमारे ३३ टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे.
अकोट शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धारोळी वेस मोमिनपुरा येथील रहिवासी सय्यद रहमत अली सय्यद हसन अली व सय्यद इक्बाल सय्यद अहमद अली वय २२ वर्ष तर अकोट शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुसऱ्या टोळीतील अमिरोद्दीन अलिमोद्दीन वय २५ वर्ष, कलीमोद्दीन अलिमोद्दीन वय २७ वर्ष आणि शरीफोद्दीन अलिमोद्दीन वय २४ वर्ष रा. ताहपुरा, टाकपुरा अकोट हे दोघेजण जिल्ह्याच्या विविध भागात टोळीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून दोन्ही टोळ्यांमधील गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या दोघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून अकोट शहर पोलिसांनी या दोन टोळ्यातील पाच गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. अकोट शहर पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात या दोघांनीही टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली; मात्र पाचही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने या दोन्ही टोळ्यातील पाच गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हा आदेश बुधवारी दिला असून टोळीला जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे. यासाठी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महाले, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी आवश्यक ती प्रक्रिया केली.