दोन दिवस शाळा बंद ठेवणारे शिक्षक मोकाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 02:42 AM2017-08-11T02:42:30+5:302017-08-11T02:42:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मुख्याध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल झाल्यानंतर वरिष्ठांना कोणतीही माहिती न देता दोन दिवस शाळा बंद ठेवणार्या शिक्षकांवर जिल्हा परिषदेने अद्यापही कोणतीच कारवाई केली नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्यामुळे उघड झाले. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी तसा अहवाल सांगत, कारवाई झाली नसल्याचे सभेत सांगितले.
तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत भिली जिल्हा परिषद शाळेत कार्यरत मुख्याध्यापक एकनाथ रामचंद्र घुरडे यांनी १७ जुलै रोजी मूर्तिजापूर येथे आत्महत्या केली. शाळेतील सहायक शिक्षक सुभाष ढोकणे, प्रकाश ढोकणे, संजय गासे, गजानन काळबांडे, अमोल राखोंडे, रवींद्र सोळंके यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले. त्यावरून सहा शिक्षकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल झाले. त्यादरम्यान, आरोपी शिक्षकांनी शाळेत उपस्थित न राहता ती बंद ठेवली. तसेच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून त्याच शाळेत रुजू होण्याची तयारी सुरू केली. आत्महत्येस कारणीभूत असल्याचे पुरावे शाळेतच आहेत, त्यामुळे त्या शिक्षकांना तेथे रुजू करू नये, त्यांची इतरत्र बदली करावी, या मागणीचे निवेदन मृतकाचा मुलगा अनुप घुरडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांना २७ जुलै रोजीच दिले आहे. त्यावेळी शिक्षकांनी दोन दिवस शाळा अनधिकृतपणे बंद ठेवल्याचा प्रकारही पुढे आला. त्याचा अहवाल तेल्हारा गटशिक्षणाधिकार्यांनी शिक्षणाधिकार्यांना पाठवला. त्यावर कारवाईच झाली नसल्याचे सभेत पुढे आले. त्यावर एवढय़ा गंभीर बाबीवरही जिल्हा परिषदेचे किती दुर्लक्ष आहे, हे दिसून आले.
सदस्यांमध्ये सभागृहातच जुंपली
शिक्षकांवर कारवाई का केली नाही, त्यापैकी काही शिक्षकांवर आधीचेही गंभीर गुन्हे असल्याचे पांडे गुरुजी सांगत असताना बेलखेडचे जिल्हा परिषद सदस्य गजानन उंबरकार त्यांच्यावर चांगलेच उसळले. आधीचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती तुमच्याकडे आहे का, काहीही सभागृहात सांगू नका, असे त्यांनी सुनावले. या प्रकाराने पांडे गुरुजी क्षणभर अवाक झाले. गुन्हे दाखल असल्याचे जाऊ द्या, शाळा दोन दिवस बंद नव्हती का, यावर मात्र, उंबरकार सहमत झाले.
ढोकणे यांच्यावर आधीचेही गुन्हे
मुख्याध्यापक घुरडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील आरोपी सुभाष ढोकणे यांच्यावर हिवरखेड पोलिसात तीन गुन्हे दाखल आहेत, तर संजय गासे यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे.
विशेष म्हणजे, ढोकणे यांच्यावर एप्रिल २0१७, मार्च २0१६ या लगतच्या काळात गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरीही त्यांना शिक्षण विभागाकडून सूट देण्याचा प्रकार घडत आहे.
-