अकोल्यात दोन दिवस विदर्भ लेखिका साहित्य संमेलन; अध्यक्षपदी डॉ. शोभा रोकडे
By राजेश शेगोकार | Published: April 21, 2023 03:52 PM2023-04-21T15:52:38+5:302023-04-21T15:53:00+5:30
साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून विजयाताई ब्राह्मणकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, प्रा. किशोर बुटोले यांची प्रमुख उपस्थिती राहील.
अकोला : मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूरतर्फे आयोजित विदर्भ लेखिका साहित्य संमेलन अकोल्यात दि. २३ व २४ एप्रिल रोजी होत आहे. त्यानिमित्ताने विदर्भातील लेखिका, कवयित्रींची मांदियाळी दाेन दिवस अकोल्यात राहणार आहे.
मलकापूर, अकोला येथील देविकामाई देशमुख प्राथमिक शाळेत आयोजित या संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका डॉ. शोभा रोकडे राहतील, तर संमेलनाचे उद्घाटन नागपूरच्या डॉ. मनीषा यमसनवार यांच्या हस्ते होईल. स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र पदवीधर संघर्ष संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय दुतोंडे राहतील. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून विजयाताई ब्राह्मणकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, प्रा. किशोर बुटोले यांची प्रमुख उपस्थिती राहील.
संमेलनाच्या निमित्ताने विशेषांकासह कवयित्री उषा भोपळे, डॉ. प्राची निचळ, विजया ब्राह्मणकर, देवका देशमुख, विजया कडू, ज्योती ताम्हणे, डॉ. वैशाली कोटंबे, विजया मारोतकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. ॲड. मंगला नागरे यांच्या अध्यक्षतेत गझल मुशायरा रंगणार आहे. २४ एप्रिल रोजी डॉ. अनघाताई सोनखासकर यांच्या अध्यक्षतेत कथाकथन होईल. शीलाताई गहिलोत यांच्या अध्यक्षतेत कवी संमेलन होईल. साहित्य संमेलनाच्या समाराेप सत्राला नीता बाेबडे, म. रा. साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी उद्याेजक सुगत वाघमारे, राजेंद्र देशमुख यांच्यासह मान्यवरांचा गाैरव करण्यात येणार आहे. संमेलनासाठी डॉ. विजय दुतोंडे, देवकामाई देशमुख, शीलाताई गहिलोत, अनघाताई साेनखासकर, वैशाली काेटंबे, प्रतिभा पाथ्रीकर आदी परिश्रम घेत आहेत.
वैदर्भीय प्रतिभेला मिळणार वाव
संमेलनात वैदर्भीय प्रतिभेला वाव मिळणार असून, विदर्भातील विविध क्षेत्रातील महिलांना ‘विदर्भ स्त्री रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. डाॅ. उषाकिरण आत्राम यांच्या अध्यक्षतेत ‘वैदर्भीय लेखिकांचे लेखन’ या विषयावर परिसंवाद हाेईल. माधुरी अशिरगडे यांच्या अध्यक्षतेत प्रिया बापट यांच्या उपस्थितीत विदर्भातील ११ जिल्ह्यांतील २५ कवयित्री कविता सादर करतील. कप्पा मनातला अंतर्गत ‘माझं आईपण’ या विषयावर परिसंवाद हाेईल.