मुंबईकडे रिकामे जाणारे ऑक्सिजनचे दोन टँकर अकोल्यात थांबविले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:16 AM2021-04-26T04:16:34+5:302021-04-26T04:16:34+5:30
अकोला : विदर्भातील काही जिल्ह्यांत ऑक्सिजनचा पुरवठा केल्यानंतर मुंबईकडे रिकामे जाणारे दोन टँकर रविवारी दुपारी जिल्हा प्रशासनामार्फत अकोल्यात थांबविण्यात ...
अकोला : विदर्भातील काही जिल्ह्यांत ऑक्सिजनचा पुरवठा केल्यानंतर मुंबईकडे रिकामे जाणारे दोन टँकर रविवारी दुपारी जिल्हा प्रशासनामार्फत अकोल्यात थांबविण्यात आले. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दोन्ही टँकर नागपूरला पाठविण्यात येणार आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यासाठी विदर्भात टँकरची गरज भासत आहे. नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात शनिवारी रात्री ऑक्सिजनचा पुरवठा केल्यानंतर रविवारी दोन रिकामे टँकर मुंबईकडे जात होते. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी टँकरची गरज असल्याने मुंबईकडे रिकामे जाणारे दोन टँकर अकोल्यात थांबवून नागपूरला पाठविण्याचे नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळविले. त्यानुसार यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यानुषंगाने मुंबईकडे रिकामे जाणारे एमएच ०४ एचडी ३७२६ क्रमांकाचे टँकर व अन्य एक असे दोन टँकर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पथकाने अकोला शहराजवळील रिधोरा येथे थांबवून खदान पोलीस ठाण्यात आणले. अकोल्यात थांबविण्यात आलेले दोन्ही टँकर ऑक्सिजन पुरवठ्यासाठी नागपूरला पाठविण्यात येणार आहेत.
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी नागपूरला टँकरची गरज आहे. त्यानुषंगाने नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कळविल्यानुसार मुंबईकडे रिकामे जाणारे ऑक्सिजनचे दोन टँकर अकोल्यात थांबविण्यात आले असून, ऑक्सिजन पुरवठयासाठी दोन्ही टँकर नागपूरला पाठविण्यात येणार आहेत.
जितेंद्र पापळकर,
जिल्हाधिकारी
..................फोटो...............